Friday, April 2, 2010

         कुर्ग ला न्यायला विसरलेल्या फ़रसाणाची विल्हेवाट, म्हणजे चांगल्या रितीने विल्हेवाट लावण्यासाठी :) arrange केलेल्या मिसळ पार्टी मधे राजे उर्फ़ गौरव ने पौर्णिमेच्या रात्री स्कंदगिरीच्या night trek ची कल्पना मांडली. स्कंदगिरीच्या night trek बद्दल आम्ही जवळ जवळ वर्षभर ऐकत होतो. म्हणजे चांगलं ऐकत होतो. :) आधीच night trek त्यामुळे आम्ही excited होतो त्यात पुनवेच्या राती वगैरे..म्हणजे अगदी दुधात साखर किंवा सोनेपे सुहागा.. situation ला साजेसं म्हणायचं तर ट्रेकात चांदणं :) असं झालं आणि भरीत भर म्हणजे ती रात्र शनिवार रात्र होती.  म्हणजे अगदी साखरेच्या दुधात केशर किंवा आता बॅंगलोर मधे आहोत म्हणुन साखरेच्या दुधात बादाम पूड अशी situation झाली ! :) त्यामुळे १-२ लोक वगळता सगळे अगदी एका पायावर तयार !

२-३ दिवस उलटताच एका मित्राने त्याच्याकडे संग्रहीत असलेले स्कंदगिरीचे काही फोटो शेअर केले.. फोटो इतके अप्रतिम होते, की एक क्षण वाटून गेलं की ही कोण्या फोटो एडिटर ची तर कमाल नाही ? इकडचे ढग, तिकडचं आकाश आणि पलिकडचे डोंगर एकत्र करून सुंदर फोटो create करून खपवणारे भामटे आजकाल पुष्कळ असतात. पण नाही, त्या मित्राने, विवेकने सांगितले की अगं ते फोटो खरे आहेत. मित्राच्या कॅमेरातले. एडिटेड नाहीयेत. मग मात्र आमची उत्सुकता शिगेला पोचायला वेळ लागला नाही आणि ट्रेक ला अजुन २ आठवडे शिल्लक होते ! !

हळुहळु एकदाचा तो दिवस येऊन ठेपला. प्रत्येकासाठी ब्रेड बटर, ब्रेड जॅम, १ बिस्किट पॅकेट, २ चॉकलेट बार असं पॅकेज तयार केलं होतं. त्याचं वाटप करून एकदाचे आम्ही निघालो 7 bikes, 1 car अशी फ़ौज घेऊन. काही पुढे, काही मागे असं करत एका फ़ाट्याला येऊन पोचलो जिथे डावीकडे वळून स्कंदगिरीचा रस्ता जातो. तिथे वळलो खरं पण तिथुन पुढे मिट्ट काळोख ! आणि त्यात आला मधे एक त्रौक. म्हणजे तीन रस्त्यांचं जंक्शन. इथुन वळायचं कुठे ! तिथे एकमेव कन्नड पाटी होती. आता आमच्यातल्या एका मित्राला अभिजितला अस्खलित कन्नडा बोलता येत होतं पण वाचता येत नव्हतं. म्हणजे कन्नडा वाचता येत नव्हतं :) त्या मुळे झाले वांदे. सर्वात पुढे असलेल्या कारने डावीकडे गाडी वळवली खरी पण थोडं पुढे आल्यावर २-३ जणांना शंका आली आणि रस्त्यातच थांबलो. आता पुढे जायचं की मागे काही कळेना. एक क्षण वाटलं आता ट्रेकही इथेच, सुर्योदयही इथेच. :D. मग २ जण परत मागे आले आणि त्या junction ला पोचून तिथे कोणाला तरी विचारु म्हणुन तिथे येऊन थांबले. तिथेही काळं कुत्रं नव्हतं चौकशी करायला. मग काही वेळात एक टेंपो आला. त्याच्याकडुन रस्ता कळला.. आम्ही रस्ता चुकलोच होतो. उरलेले सगळे मग आल्या पावली मागे फ़िरले आणि परत सगळे junction ला पोचले. आणि मग आम्ही योग्य(?) वाट धरली. टेंपोवाला पुढे आणि आम्ही मागे अशी आमची फ़ौज. ५ मि. आम्ही आपले टेंपोला follow करतोय. मग प्रत्येकाचे कल्पक तर्क सुरू. ’अरे, टेंपोवाला आपल्याला kidnap तर करत नाहीये’, ’टेंपोवाल्याने आपल्याला एका निर्जन ठिकाणी (अजुन काय आता डोंबल निर्जन !) नेऊन आपल्याकडच्या सामानावर दरोडा टाकला तर’.. अजुन निरनिराळे तर्कवितर्क येण्या आधीच स्कंदगिरीचा पायथा आला.. हुश्य !

तिथे पार्कींग, urgent calls :), Guide hire करणे इ. time pass गोष्टी उरकल्यावर आमचा ट्रेक सुरू झाला. एव्हाना २ वाजून गेले होते. १९ जण ३ ग्रुप मधे आपोआप divide झाले. गाईड obviously सर्वात पुढे होता. आमच्यातल्या एका मैत्रिणीला अस्थमाचा त्रास असल्यामुळे आमची ६-७ जणांची सर्वात शेवटची बॅच निवांत चढत होती. अरुंद, रुंद, सोप्प्या, अवघड, खडकाळ, सपाट अशा विविध वाटांमधून टॉर्च च्या  मदतीने (नाही, पौर्णिमेची रात्र असल्यामुळे चांदण्याचा प्रकाश पुरेसा असेल असं तुम्हाला वाटत असेल पण तसं काही नव्हतं. निदान आमच्या सारख्या नवोदितांना तरी नव्हतं. ) वाट काढत एकदाचे आम्ही त्या शिखरावर पोचलो. ४.३० वाजुन गेले होते. काही आधीच पोचलेली मंडळी आमची वाट पहात थांबली होती. पोचताच जाणवला तो वेड्यासारखा गार वारा तोही बोचणारा ! त्यामुळे गाईड ने सुचवलेल्या(त्याच्या लाकुड विकणा-या मित्रांचा business नको का व्हायला! ) शेकोटीची कल्पना हो-नाही करत(कारण काही वेळात सुर्योदय होईल असं वाटलं) संपन्न करण्याचं ठरवलं.  पुनवेची रात्र / पहाट अन त्यात शनिवार वगैरे (पहिला परिच्छेद वाचणे) असल्यामुळे जिकडे तिकडे corner corner ला नुसता लोकांचा सुकाळ. शेवटी विवेक ने एक झकास corner cum उंचवटा शोधून काढला. तिथे आम्ही आमचा काही तासांचा मुक्कम ठोकला.

शेकोटी पेटल्यावर जराशी मिळालेली ऊब सुद्धा वाळवंटात मिळालेल्या पाण्याच्या २ घोटांएवढी मोलाची होती. कदाचित वाटेल , जरा अतीच लिहिलंय. जर इथेच ही परिस्थिती असेल तर तिकडे वरती काय हाल होतील, सिमला, मनाली ला.. खरंय..पण त्या वेळी खरंच वाईट्ट वारं होतं.
तिथेच सगळ्यांकडे आपापलं breakfast parcel मी सुपुर्त केलं, सगळ्यांनी ते मटामटा खात संपवलं.

शेकोटी असल्यामुळे मग गाण्यांचा मूड बनला आणि आठवतील तशी

उडे जब जब जुल्फ़े तेरी
हमे तो लुट लिया मिलके हुस्न वालो ने
चम चम करता
तेरा होने लगा हू (हे शेकोटीला शोभत नाही, पण तरी )

वगैरे गाणी म्हणायला सुरूवात झाली.
मग निखिल ने काही शेकोटी स्पेशल गाणी म्हटली..

काही वेळात मग सगळ्यांना सुर्योदयाचे आणि काही जणांना निद्रापुर्तीचे वेद लागले.. :)
हळुहळु आम्ही सगळे पुर्वेला असलेल्या एका उंचवट्यावर येऊन थांबलो.  वारा सुसाट वाहात होता !
हळु हळु वाट लागत चालली होती ! १०-१५ मि. उलटली तरी सुर्यदेव काही येईना. आता ये बाबा एकदाचा असं वाटायला लागलं ! त्या बोच-या वा-याची आठवण पण नकोशी वाटते ! आणि अजुन १० मि. गेल्यावर थोडंसं उजाडायला लागलं. काळं आकाश हळुहळू निळसर रंगाने व्यापून गेलं.

त्या नंतरही नेहमीचा आपला सुर्योदय होईल असंच एक feeling होतं, निदान माझ्या मनात तरी.  मग केशरी रंग दिसू लागला.. आता मात्र सुर्योदयाचे वेद लागायला लागले. मग हळुहळू त्या तेजाच्या केशरीबुंद गोळ्याचं ऐटीत आगमन सुरू झालं. जिकडे तिकडे कॅमेराज अन फोटोग्राफ़र ! काही क्षणातच सुर्याचा पुर्ण गोळा आपल्या स्थानावर विराजमान झाला.. अन काय सांगावं. अचानक लक्ष गेलं तर ढगांचे पुंजके च्या पुंजके गोळा झाले होते... दरीतून खाली दिसणारं गाव, गावातली घरं, शेती हे सगळं धुसर होत चाललं होतं. आणि समोर नजर टाकली तर सगळे ढग ग्रुप करून पिकनिक ला निघाले आहेत की काय असं वाटत होतं.. क्षणा क्षणाला ढगांची संख्या वाढतच होती.. आता दरीतून खाली दिसणारं गाव पुर्ण पणे झाकलं गेलं होतं. डावीकडुन उजवीकडे अशी १८० डिग्री मधे मी माझी मान वळवली आणि जे समोर होतं त्याने माझे डोळे अक्षरश: दिपून गेले..
जिकडे तिकडे नुसते ढगच ढग. आता तुम्ही म्हणाल हिचं ढग पुराण कधी संपणार !   पण खरंच ते दृश्य कदापि विसरणं शक्य नाही.  आपण Hill Station वर जे Sunsets, Sunrises बघतो, तिथेही नक्कीच ढग असतात, पण ते विरळ असतात.. प्रत्येक पुंजका मोजता येईल असे असतात. पण इथे म्हणजे ढगांचा मोठ्ठा गालिचाच तयार होता, नव्हे.. ढगांचं मऊ, गुबगुबीत अशी गोधडीच तयार झाली होती.
एखाद्या चांगल्या चित्रकाराने काढलेल्या चित्रात असं नक्कीच बघायला मिळेल किंवा एखाद्या animated movie मधे ! पण प्रत्यक्ष बघताना काय वाटत होतं, हे शब्दातीत आहे !
असं वाटत होतं की आजुबाजुचं सगळं काही डोळ्यात भरून घ्यावं .. अगदी भरभरूऊऊऊऊन ! असं मला या आधी कुठलाही सुर्योदय, सुर्यास्त किंवा अजुन कुठलाही डोंगर, दरी पाहून वाटलं नव्हतं .. ढगांचे नुसते थरावर थर आणि मध्यभागी तप्त सुर्याचा केशरी गोळा, करावं तितकं वर्णन कमी आहे ह्या दृश्याचं ! ! कित्तीतरी वेळ मी कॅमेरा, फोटो हे सगळं विसरून गेले होते.. कोण कुठे आहे याचंही भान मला नव्हतं.. मला फ़क्त ते सुंदर दृश्य एक कायमची आठवण म्हणुन डोळ्यात टिपून घ्यायचं होतं !

थोडंफ़ार फोटो सेशन झाल्यानंतर परत खादाडीचा मूड बनला. तिथे असलेल्या टपरीतून गरम गरम पाणीदार मॅगी, बेचव ऑमलेट यांची चव घेताक्षणी आमची हौस फ़िटली ! :D मग हळुहळू उतरायला सुरूवात केली. उतरतानाही आमची बॅच शेवटची ठरली. निवांत, रमत गमत, अधुन मधून फोटो सेशन करत आम्ही उतरलो. 

नंतर अनेक दिवस असंच मनात येत राहीलं, कोणास ठाऊक त्या पहाटे कुठे होतो आम्ही .. ! !

No comments:

Post a Comment

Followers