Tuesday, February 24, 2009

प्रिय चिंटुस

प्रिय चिंटुस,
रोज सकाळी सकाळ हातात घेतल्यावर हेड लाईन वाचण्या आधी आतल्या पानावर आज चिंटू काय आलंय हे उत्सुकतेने पाहणार्‍या लाखो वाचकांपैकीच मी एक…. रोज आम्ही तुला बघतो.. तुझ्या भोवती काय चाललय ते बघतो सकाळ मार्फत…आज म्हटलं तुझ्याशी गप्पा माराव्यात या पत्रा मार्फत !
सगळे जण सकाळी रोज तुझी इतकी वाट का पाहत असतात याचाच विचार करतीये मी. वय वर्ष 7 ते 70 मधले सगळे चिंटू वाचल्याशिवाय पेपर खाली ठेवत नाहीत… किंबहूना घाई असेल तर फक्त चिंटू वाचून पेपर खाली ठेवणारीही मंडळी आहेत याबद्दल शंका नाही…

हल्ली घरा घरांमधे एकमेकांनाही "चिंटू वाचलं का ?" असे प्रश्न विचारले जातात त्यात अभ्यास, गृहपाठ,निबंधा याविषयक विनोद असले तर सगळ्या आया आपापल्या मुलांना हे सांगितल्याशिवाय राहत नाहीत …"आजचा चिंटू वाचा खास तुमच्यासाठीच आहे" एवढ्या धावपळीच्या आयुष्यातही तू आमच्या घरात, हृदयात जे स्थान करून ठेवलं आहेस…त्याने मी खरच अचंबित होते….. तू,तुझे आई पप्पा, तुझी मैत्रीण मिनी, मित्र बगळ्या आणि मित्र किव्वा शत्रू (भांड्णांपर्यंतच) राजू हे सगळे आमच्याच ग्रूप मधलेच झाले आहेत (मग ग्रूप वया प्रमाणे शाळेचा, कॉलेज चा, ओफिस चा कोणताही असो…. ) चिंटू, अरे काही दिवस जर बगळ्या किव्वा राजू आले नाहीत तर तुला आम्हाला विचारावसं वाटतं का रे बगळ्याशी कटटी केलीस का की राजू शी मारामारी ? कुठेत ते ? तू केलेली कोणतीही गंमत, खोडी, लपवाछपवी, मारामारी, भांडणं, छोटीशी केलेली फसवा फसवी…. सगळं कितीही चुकीचं असलं तरी आम्हा सगळ्यांना त्यातला निरागस चिंटूच दिसतो….

जोशी काकुंच्या बागेतल्या कैर्‍या तोडणे असो की राजू शी केलेली मारामारी आईपासून लपवण्याचा निष्फळ प्रयत्न असो त्यात आम्हाला आमचा निरागस चिंटूच दिसतो. पोहोण्याची नक्कल करून पोहता येतय असं दाखवणारा चिंटू असो किव्वा शाई भरताना ती सांडते हे माहीत असूनही पप्पांना तेच काम सांगणारा लबाड चिंटू असो….आम्ही मात्र त्याच्या या लबाडी कडे सोयीस्करपणे काना डोळा करतो…. कारण आम्हाला माहीत आहे की आमचा चिंटू एक गुणी बाळ आहे आणि अशा चुका किव्वा गमतींमधे कोणतीही बदमाशी त्याच्यात दडलेली नाही! आई ने शिकवलं आहे म्हणून छान वर्तमान पत्र खाली पसरवून त्यावर बसून निवांत आंबे खाणारा चिंटू किव्वा आईने सांगितलं आहे म्हणून का होईना खेळणी कपाटात ठेवून आपली खोली आवरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा चिंटू पाहिला की खरंच तुझं खूप कौतुक वाटतं ! (तू लगेच हरभर्‍या च्या झाडावर चढून खोली आवरणं सोडून देणार नाहीस याची खात्री आहे आम्हाला हो!)

चिंटू, तुझ्या एवढा पिटूकला जेव्हा पु. लं च्या आठवणीने खिन्न होऊन खिडकीतून बाहेर बघत असतो, तेव्हा त्याच्या उदास भावना आमच्या ही हृदयाला भिडतात किंबहूना त्याच भावना आमच्याही असल्यामुळे आमचे डोळे टचकन ओले कधी होतात ते कळतही नाही. आणि मग चिंटू लाडका वरुन मोअर लाडका आणि मोस्ट लाडका अश्या सुपर्लेटिव डिग्री कडे वळतो… आम्ही शाळेतुन कॉलेज, कोलेजातुन ओफिस या टप्प्यांतून जातोय .... थोडक्यात मोठे होतोय. पण आमचा लाडका, सॉरी मोस्ट लाडका चिंटू मात्र शाळेतुन कॉलेज आणि ओफिस मधे कधीच जाऊ नये असं वाटतं. रागाऊ नकोस. तुझी प्रगती रोखण्याचा कोणताही नीच विचार नाहीए आमचा. उलट प्रगतीची नवीन नवीन शिखरे तू पार करावीत म्हणून आमच्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी आहेत. पण रोज सकाळी सकाळ मधून भेटणारा आमचा चिंटू तसाच अगदी तस्साच राहावा, अशीही मनापासून इच्छा आहे. तुझं ते इतकूसं गोंडस व्यक्तिमत्व, मिश्किल हावभाव हे सगळा आम्हाला कायम तसंच अनुभवायचंय
म्हणून आम्ही शाळा-कॉलेज-नोकरी-रिटायरमेण्ट या साखळीतून जातच आहोत…पण त्यातून जाताना आम्हाला मात्र आमच्या चिमुकल्या पिटुकल्या चिंटूलाच भेटायचंय ज्याच्याशी आमचं नातं मित्र, मुलगा,नातू असं बदलतही राहील. मात्र पाहिजे तोच छोटा चिंटू .... भेटशील ना !!

तुझीच मैत्रीण,
अदिती राजहंस.

Followers