Friday, September 23, 2011

मुंबई .. माझ्या नजरेतून (१)

            लहानपणापासून मी मुंबई बद्दल आई बाबांकडून ऐकत आले आहे. ३ री  पर्यंत डोंबिवलीत राहण्याची संधी मिळाली पण त्यानंतर मुंबईबाहेर पडावे लागले. आणि तसंही डोंबिवली म्हणजे काय खरी मुंबई नव्हे हे आता कळले आहे. :P 
आता पुन्हा मुंबईत यायचा chance मिळाला. मुंबईत यायचे ठरले, तेव्हा मी बंगलोरला होते. तिथल्या मराठी मित्र मंडळातून जे मुंबईचे होते त्यांना मी सहज मुंबईबद्दल 'review' विचारायचे. बहुतांशी लोक मुंबईचं कोडकौतुक करत. नाही म्हटलं तरी मुंबई न आवडणारेही १-२ लोक सापडले. अशा या मुंबईचा गाजावाजा मी जरा जास्तच ऐकत आल्यामुळे तशी मी ह्या शहराबद्दल उत्सुक होते.   
मुंबईत पाऊल ठेवताक्षणी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे हवेतला तीव्र दमटपणा. त्याच क्षणी वाटलं, बोंबला! आपलं इथे कसं होणार देव जाणे. कारण पहिल्यापासूनच माझं आणि घामाचं वाकडं आहे. आणि इथे तर क्षणोक्षणी घामाची अंघोळ घडत असते. त्याची सुद्धा सवय होते असं मुंबईतल्या नातेवाईक आणि मित्र मंडळींकडून  ऐकून ऐकून मी थोडंफार मानसिक समाधान प्राप्त केले होतं. तर मुंबईत हळूहळू मी रुळायला  लागले. लिंकिंग रोड आणि SV Road च्या मध्ये साधारण मी रहायला आहे .. तर आजूबाजूचा भाग explore करायला मी  सुरुवात केली आणि नंतर लोकल भटकंती. सुरुवातीला १-२ दा कोणाबरोबर तरी लोकल ने प्रवास केला. मग एकटीनेच जायला सुरुवात केली. तेव्हा कोणत्या बाजूला कोणती ट्रेन येते, digital board कसा वाचायचा, आपण नक्की योग्य ट्रेन मध्ये शिरलोय ना, नाहीतर चर्चगेट ला जायचेय आणि पकडली बोरीवली ट्रेन असली भानगड व्हायला नको. पण मुंबईने सगळं खूप पटापट शिकवलं. मुंबईत कोणीही कोणाला बिनधास्त शंका विचारतात; अर्थात मुंबईप्रवासाविषयी. कोणाला  उगाच लाज किंवा संकोच वाटत नाही. उदा. ही fast लोकल आहे ना, ही बेलापूर लोकल ठाण्याला थांबते ना,  पुढची विरार लोकल कधी आहे.. आज ट्रेन्स लेट आहेत का, ही ट्रेन बांद्रा आहे की बोरीवली (कारण बांद्रा चा shortform B आहे आणि बोरिवलीचा Bo. तर confusion झाल्यास) इ.   आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक मनमोकळेपणाने सांगतात सुद्धा. 'मला नाही माहीत' किंवा 'वाचता येत नाही का' असल्या खवचट टिपण्या करत नाहीत.  
मुंबई खूप मोठी असली तर एक मात्र आहे, मुंबई ची रचना कळणं अवघड नाहीये तसं. शेवटी एका बेटावर वसली आहे ही मुंबई. आकार वाढू शकतच नाही. वाढताहेत ती फक्त लोकं. :) मुंबई ही चर्चगेट  ते विरार अशी खालून वर पसरली आहे. एकानंतर एक सरळ रेषेत सगळी  स्टेशन्स अहं sorry suburbs पसरली आहेत. दादर, बांद्रा, गोरेगाव, बोरीवली यांना मी आपली स्टेशन्स म्हणायचे साध्या भाषेत. पण नाही हो, मुंबईकर त्यांना suburbs म्हणतात :) अशी ही सगळी suburbs  मिळून मुंबई तयार होते. प्रत्येक suburb चं स्वत:चं असं वैशिष्ट्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ, पार्ले म्हणजे  खास मराठी (आणि गुज्जू) लोकांची वस्ती. बरेचसे साहित्यिक, कलाकार पार्ल्याचे! मुंबईतलं पुणं असंही म्हणतात पार्ल्याला. इथेच  आपल्या आवडीच्या प्रसिद्ध पार्ले बिस्किटांची factory आहे; म्हणूनच नाव विलेपार्ले. दादर - सर्व दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण. south bombay ला स्वत:ची  अशी एक वेगळीच ओळख आहे. असं प्रत्येक भागाला आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व आहे. मुंबईची गर्दी, अस्वच्छता हे कुप्रसिद्ध मुद्दे असले तरी मुंबईत काही भाग खरंच उत्कृष्ट, स्वच्छ, posh आणि मुख्य म्हणजे शांत आहेत.  मस्त वाटतं भटकायला. 

   एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ ही उक्ती मुंबईकर अगदी सार्थ ठरवतात. आता इथे मुंबईकर म्हणजे फक्त मुंबईचे असलेलेच नव्हे तर मुंबईत तूर्तास राहणारे सगळे अपेक्षित आहेत. म्हणजे मग त्यात सगळ्या प्रांतातले, कायमस्वरूपी इथे असणारे, तात्पुरते आलेले सगळे सगळे आले. आणि त्यात चक्क रिक्षावाले ही जमात पण आली. पुणे, बंगलोर इथले रिक्षावाले पाहिल्यावर मुंबईचे रिक्षावाले बरेच बरे आहेत. रात्री अपरात्री ही कुठेही येण्यास फारशी कुरकुर न करणे, कितीही जवळच्या भागात यायला चटकन तयार होणे, उरलेले सुट्टे पैसे passenger मागण्याची वाट न  बघता चोख परत करणे या कामगि-यांमध्येच त्यांचं यश आहे. आता माझा हा परिच्छेद वाचून कोणीतरी 'असला काही अनुभव मला आला नाही' वगैरे म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आंब्यांच्या आख्ख्या पेटीत एखादा आंबा सडका निघणारच. त्याला पर्याय नाही. 

तर अश्या या शहरात पक्के मुंबईकर आणि बाहेरचे लोक मुंबईच्या गर्दी, उकाडा अशा रोजच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ठाण मारून का आहेत, याचं गमक मला हळूहळू का होईना कळायला लागलंय. हो, मुंबईत गर्दी आणि उकाडा या २ मुद्द्यांना समस्याच म्हणावं लागेल. आणि जो पर्यंत तुम्ही या २ मुद्द्यांना निव्वळ सतत घडणा-या साध्या घटना किंवा Part of routine न समजता 'समस्या' समजता तो पर्यंत तुम्ही पक्के मुंबईकर नव्हे हेही तितकंच खरंय!  ;)    


- अदिती 


Followers