Tuesday, May 31, 2011

मॉल मध्ये खरेदी ? नको रे बाबा !

सध्या बिग बजार, स्टार बजार, ब्रॅंड फ़ॅक्टरी या असल्या शॉपिंग मॉल्स ला अगदी ऊत आलंय ! ब्रॅंड फ़ॅक्टरी म्हणजे सगळ्या ब्रॅंड्स चे कपडे एकाच छताखाली उपलब्ध !
परवाच तिथे जाण्याचा योग आला. आला म्हणजे आणला.. Urgently जीन्स घ्यायच्या होत्या मला २. एका मित्राशी बोलताना लक्षात आलं की shopping MG road किंवा Brigade road ला जायच्या ऐवजी ब्रॅंड फ़ॅक्टरी ला जावं जिथे म्हणे सेल चालु आहे. म्हटलं बघू तरी सगळ्या ब्रॅंड्स चे कपडे एकाच वेळी. म्हणुन मी आणि माझे २ मित्र निघालो. होती ती शनिवार संध्याकाळ !
सगळ्या रिकामटेकड्या लोकांची झुंबड त्या मॉल मधे !

पुर्वी रिकामटेकडे लोक , म्हणजे रविवारी रिकामटेकडे असलेले लोक संध्याकाळी बागेत जायचे. जत्रेला जायचे. आता लोक मॉल मधे जातात ! तर त्या जत्रेत आपलं sorry त्या मॉल मधे शिरल्या शिरल्या इथे कमालीचा गोंधळ असणार अशी कल्पना येऊन गेली. Levi's ची जीन्स शोधता शोधता नुसते नाकी नऊ आले आणि मघाशी नुसती येऊन गेलेली कल्पना खात्रीत बदलली.  
शेवटी available असलेल्या brands मधून २ जीन्स final केल्या; म्हटलं trial तरी घेऊन येऊ. Trial rooms च्य बाहेर आता वेगळाच गोंधळ ! हातात कपड्यांचे बोचके च्या बोचके घेऊन लोकं रांग लावून उभे ! ! मी कपाळाला हात लावला.. रांगेत उभं राहण्याशिवाय मला पर्यायच नव्हता. आत गेलेल्या मुली, बायका कित्ती वेळ झाला तरी बाहेर यायला तयार नव्हत्या ! सार्वजनिक स्वच्छता गृह किंवा अगदी multiplex च्या rest room मधेही वेळ लागणार नाही इतका वेळ ह्या बायका फ़क्त कपड्यांची trial घ्यायला  लावत होत्या ! ! आता एवढ्या मेहनतीने कपडे select केले होते म्हणून म्हटलं जाऊ दे अजून ५मि. आणि एकदाचा माझा नंबर आला ! कपडे final केल्या नंतर ते घेऊन कधी तिथून बाहेर पडतोय असं झालं होतं. तोच विचार करत मी पैसे भरण्याच्या counter  वर  
गेले आणि आज माझा अंत पाहण्यात येणार आहे ह्याची लगेच जाणीव झाली. सगळ्या counters वर भल्या मोठ्या रांगा होत्या. आता एवढ्या मेहनतीने कपडे select करून final केले होते म्हणून म्हटलं जाऊ दे अजून १५मि. आणि माझा नंबर आला असं वाटलेलं असतानाच counter वरच्या पोराला साक्षात्कार झाला की कार्ड machine गंडलेलं आहे! आणि आज काल 'cash carry'  करण्यापेक्षा  'कार्ड  carry ' करणे अधिक सोयीचे झाले असल्यामुळे  आणि त्याही पेक्षा डोळ्या देखत पैश्यांच्या नोटा दुस-याच्या  हवाली करताना वाटणारी हळहळ  नाहीशी करण्याचे सामर्थ्य त्या कार्ड मध्ये असल्यामुळे कार्ड जरा जास्तच सोयीचे वाटते. आणि म्हणूनच  'cash  payment ' करण्याचा पर्याय त्या दिवशी माझ्याकडे उपलब्ध नव्हता ! एक क्षण वाटलं गेले खड्यात ते कपडे... जावं इथून. पण आता एवढ्या मेहनतीने कपडे select करून final करून रांगेत १५मि. उभे राहिल्यावर म्हटलं जाऊ दे अजून १०मि. आणि माझा नंबर त्यांनी दुस-या counter  वर shift  केला.  बोंबला. आता तिथे असलेले लोक आमच्यावर किंवा counter staff  वर भसकन खेकसून नवीन तंटा सुरु करणार या विचारानेच धडकी भरली आणि या वेळी मात्र आपण पण आरडा ओरडा करायचा असा मनाशी ठरवत असतानाच तिथला manager सारखा कोणीतरी आला आणि आमच्या रांगेतल्या लोकांना त्यांनी उर्वरित रांगांमध्ये सारख्या प्रमाणात 'divide' केलं. हुश्य! आता पुन्हा वाट पाहणे मोहीम सुरु ! १७मि. शांत चित्ताने रांगेत उभं राहिल्या नंतर एकदाचा माझा नंबर आला. इथे counter वर एक मुलगी होती. मुलगी कसली कुपोषित बालिका असावी असं पाप्याचं पितर होतं ते. आणि आपल्या बुद्धी, शक्ती, युक्ती क्षमते प्रमाणे निवांतपणे आपल्या सवडीने प्रत्येक price tag bar  code reader समोर धरत  तिने बिल तयार केले मी कार्ड हातात घेऊनच उभी होते(उघड आहे). कार्ड swipe करणे, password टाकणे मग पुन्हा ते बिलाचं छोटं चिटोरं येईपर्यंत वाट बघून मग त्यावर सही करणं या अत्यंत कंटाळवाण्या  आणि बिनडोक कार्यक्रमानंतर मग कपड्यांच्या घड्या घालून पिशवीत ठेवून ती पिशवी माझ्याकडे सुपूर्त करताना ती मुलगी म्हणाली 'Have a nice day ahead ma'am !" त्यावेळी भो.. , भ.. अश्या असंख्य शिव्या जिभेवर असूनही अजून एक क्षणही तिथे थांबायची इच्छा नसल्यामुळे एका धीराच्या, सोशिक ग्राहकाप्रमाणे मंद स्मितहास्य करून Thank you म्हणून मी बाहेर पडले.

अश्याच अनेक कथा बिग बजार, स्टार बजार येथे रोज घडत असतात. या मॉल  वाल्यांना एकच विनंती आहे. भरपूर varieties  देता, एवढ्या भरगच्च offers देता, discounts देता.. पण तुमच्यासाठीच महत्वाच्या असलेल्या बिलाच्या counters वर एवढे दुर्लक्ष! एकदा स्वत:च त्या रांगेत उभे राहून बघा.  मला काय म्हणायचेय ते कळेल आणि वळेल ही.

- अदिती.

Followers