Friday, May 31, 2013

चश्म-ए-बद्दूर पुन:श्च होणे नव्हे!

  नाही, मी चश्म-ए-बद्दूर गाणं नव्हे तर सिनेमा बद्दल बोलतेय! चश्म-ए-बद्दूर नावाचा एक नवीन सिनेमा आलाय एवढंच मी ऐकलं होतं आणि परवा कळलं की हा जुन्या चश्म-ए-बद्दूर चाच  Remake आहे!! बघायची इच्छा तर सोडाच पण मला ही संकल्पनाच नाही आवडली. Remake ह्या संकल्पनेशी काही माझं वाकडं नाही पण चश्म-ए-बद्दूर सारख्या क्लासिक सिनेमाचा Remake?! ये बात कुछ हजम नही हुई. 

                                   चश्म-ए-बद्दूर च्या इतक्या सुंदर आठवणी आहेत. त्या तिघांची ची ती दिव्य रूम, त्यातले एकसे एक पोस्टर्स, सिद्धार्थ चा सीधे पणा, ओमी ची शायरी, रवी ची cute टपोरीगिरी, ते पान टपरी वाले लल्लन मिया, मिस चमको, तिचं लोभस व्यक्तिमत्व, प्लंबर, फिल्म डिरेक्टर scene,  १० रु. चं passing the parcel, tootyfruity icecream वाला वेटर, त्या गोड आजीबाई, खोट्या मारामारीच्या plan मधली खरीखुरी मारामारी आणि मग गोड शेवट हे सगळं मनात इतकं घर करून बसलंय ना की पुन्हा तोच सिनेमा हजारदा पाहू; पण नवा जमाना म्हणून नव्या लोकांना ह्या सगळ्या मस्त कलंदर व्यक्तिरेखांमध्ये बसवून पुन्हा तो  उत्कृष्ठ दर्जा, तो innocence, ती अभिजात विनोदी दृश्य (जमली असली तरी) नाही बुवा आम्हाला पहायची .. का कोण जाणे .. :) 


Monday, May 6, 2013

बिन पिकलेला आंबेवाला

                                 मागच्या रविवारी भर दुपारी चांदण्यात मंडई,  तुळशीबाग इ. ठिकाण ची pending कामं करून परत जात असताना मला एक आंबेवाला दिसला. रस्त्यावरच boxes घेऊन open दुकानच थाटलेलं  जणू. यंदा आंब्यांचे 'असे' stalls खूप दिसताहेत. Stalls कसले, ना त्याला काही छप्पर, ना भिंती. म्हणूनच अश्या ठिकाणाहून आंबे तेही हापूस घ्यावे की नाही हाही प्रश्नच पडतो. तर हा आंबेवाला मात्र कमी पिकलेला, आपलं... कमी वयाचा होता.   ७-८ वर्षांचं पोर. भर दुपारी २ ला आंबे विकत उभं! ना तिथे सावली, ना विसावायला जागा. होतं ते फक्त रणरणतं ऊन. खेळण्याच्या किंवा आईच्या हातचा गरमागरम वरण  भात खाऊन झोपी जाण्याच्या वयात हा अर्धा जीव मात्र घरच्या जबाबदारीमुळे अकाली मोठा होऊन चिटपाखरुही नसलेल्या, ग्राहक मिळण्यास प्रतिकूल अश्या त्या निर्जन रस्त्यावरही  ठाण मारून होता.

ते दृश्य पाहताक्षणी माझी नजर तिथेच हबकली. आपोआप माझी गाडी तिथे येऊन थांबली.  खरं तर  २ एक डझन आंबे घेऊन त्याचे तिथे उभे राहिल्याचे अगदी सार्थक नाही तरी निदान त्याला थोडेसे समाधान मिळवून देणे हेच योग्य दिसत होते. पण २-४ नोटा मिळवून देण्यापेक्षा त्या क्षणी त्याला थंडगार लिंबू सरबत देणे मला जास्त रास्त वाटले.  ५मि. अलीकडे असलेल्या नीरा विक्री केंद्राच्या दादांकडून सरबत आणि थंड पाण्याची बाटली घेऊन त्या छोट्याकडे गेले.
"सरबत आवडते का लिंबाचे?"
"अं ...? नाही, नको"
"आई रागावेल?"
(ओठावर मंद हसू आणि नजर खाली)
"की हे नक्की सरबतच आहे की अजून काही असा विचार करतोएस?"
(मान नकारार्थी हलवून पुन्हा गप्प!)
(मी स्वत: एक घोट पिऊन )"झाले आता समाधान?  घे पाहू बरं आता चटकन!"

थोडसं बिचकतच त्याने ते सरबत घेतलं.
(त्याच्या कडे गार पाण्याची बाटली सुपूर्त करताना)
"बरोबर कोण नाही का तुझ्या आंबे विकायला?"
"पप्पा हायेत.  जेवायला गेलेत."

हसून त्याचा निरोप घेऊन निघाले. जरासे ऊन लागले की Mango juice, उसाचा रस, लिंबू सरबत अन काही नाही तर घरी जाऊन full speed fan नाहीतर AC, इतक्या सहजपणे options ठरवणारं माझं मन मात्र या छोटू साठी एवढं(च) केल्याची खंत आणि  एवढं(तरी) केल्याचं समाधान अश्या मिश्र भावनांमधेच घुटमळत राहिलं.



Followers