पाषाण.. मुख्य पुण्यापासून थोड्या आडभागात असलेला एक शांत, सुंदर परिसर.. पूर्वी नावाप्रमाणेच इथे फक्त पाषाण म्हणजे अर्थात टेकड्या असाव्यात कारण आता वस्ती निर्माण झाल्यानंतरही आजूबाजूला अनेक डोंगर, टेकड्या दिसतात. पाषाणची टेकडी ही त्यांपैकीच एक अशीच प्रसिद्ध टेकडी! एका घराच्या खिडकीतून दुस-या घरातल्या स्वैपाकघरातल्या भांड्याचे ढीग दृष्टीक्षेपात आणणा-या खिडकीची चौकट बघण्याचे दिवस अजून आले नाहीत इथे, आणि अर्थात.. येऊही नयेत हीच इच्छा.. :) तर अश्या या पाषाण भागात गरजेच्या वस्तूंची दुकानं, सुपर मार्केट्स तर आहेतच पण आजूबाजूच्या औंधसारख्या भागांमध्ये इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या शोरूम्स, विविध restaurants, cafes, malls इ. वैविध्यपूर्ण ठिकाणं असल्यामुळे हा भाग जलद गतीने प्रगत आणि परिपूर्ण होतोय जेणेकरून 'गावात' जायची गरज पडत नाही. गावात म्हणजे पुण्यातला मुख्य बाजारपेठेचा भाग डेक्कन, मंडई इ. भाग अभिप्रेत आहे.
अश्या या प्रदूषणमुक्त, हवेशीर भागात एक अडचण मात्र जाणवते, ती म्हणजे रिक्षांची. पुण्याची एकच काय ती खात्रीची Local transport सेवा! पण सकाळी ८ च्या आधी आणि संध्याकाळी ८ नंतर रिक्षा मिळणे कठीण.. त्यामुळे स्वत:चं वाहन असल्याखेरीज हिंडणे अवघड. तशी पुणेकरांना आपली फटफटी काढली आणि निघाले अशी सवय नक्कीच आहे, पण स्टेशन किंवा बस stand ला बाहेरगावी जायचे असल्यास कोणालातरी सोडायला जावेच लागते. एवढी प्रस्तावना देण्याचं कारण म्हणजे या अडचणीवर तोडगा आज निघाल्यामुळे मला भयंकर आनंद झाला. आजच सकाळी मला प्रगतीने मुंबईला यायचे असल्यामुळे मला ७.१५ वाजता निघायचे होते. आई, बाबा दोघंही नेमके सकाळी मोकळे नव्हते. मग बाबांनी university circle पर्यंत किंवा रिक्षा मिळेपर्यंत सोडायचं असं ठरलं. पण नशीब चांगलं की निघाल्या निघाल्या कॉर्नरलाच रिक्षा मिळाली. ते काका भलतेच बोलके होते.. बोलता बोलता मी सहज विचारलं की फोन करून बोलावलं तर तुम्ही येता का.. म्हणजे रिक्षा service द्यायला.. तर त्यांचं उत्तर होतं - 'हो तर. अहो ताई, पाषाण मध्ये बरेच रिक्षावाले असंच करत्यात. आम्हालाबी कळते न तुमची गैरसोय होते ते. तुमची गरज आणि आमची पण, नाही का.. ह्या ह्या ह्या! घ्या नंबर लिवून घ्या, रिक्षावाले बाळूकाका असं नाव लिवा.. दिवसा हवी असंल तर १ तास आधी फोन करा.. मध्यरात्री किंवा पहाटे हवी असेल तर जरा एक दिवस आधी फोन करा' , म्हटलं वा, हे लई बेस झालं! आणि जेवणाची ऑर्डर एके ठिकाणी पोचती करायला आमच्या मातोश्रींनी त्वरितच या काकांना फोन करून बोलावून घेतलं.. आणि ह्या सेवेचा फायदा करून घेतला. म्हणजे service ची trial पण झाली.. अश्या प्रकारे नवीन वर्षाच्या पहिल्या 'working day' ची सुरुवात अश्या नवीन कल्पनेने झाली. तसं इतरांना 'त्यात काय एवढं' असं वाटण्याची शक्यात आहे पण अश्या या गैरसोयीला थोड्या प्रमाणात का होईना बांध घालता आला किंवा येईल याचाच आम्हा पाषाणकरांना आनंद!
- अदिती