Thursday, December 3, 2009

बॅंगलोर मधे दांडीया रास ??? ... होय .. बॅंगलोर मधे दांडीया रास ! !

इतकी वर्षं नवरात्री - गरबा - दांडीया हे महाराष्ट्रात जरी भरभरून असलं तरी आम्ही सगळे मित्र-मैत्रीणी उत्साहाने टिप-या घेऊन दांडीया खेळायला गेलोय असं कधीच घडलं नव्हतं. आधीच टिप-या हातात कश्या धरायच्या इथपासून सुरुवात ! मग टिप-या खेळताना (खरं तर मारताना) त्या आपल्या पार्टनर च्या टिप-यांनाच लागताहेत की त्यांच्या बोटांना, मनगटाला लागत आहेत ही भिती (आणि मनातून गंमत), आणि त्यात भर म्हणजे लागलेल्या गरबा गाण्यांच्या तालाचा perfect अंदाज घेत योग्य वेळी योग्य टिपरी योग्य टिपरीलाच लागली पाहीजे..! छे !! भलतंच अवघड !! आणि perfect किंवा परिपूर्ण गरब्यासाठी चेह-यावर स्मितहास्य, नाचताना grace आणायची आणि हे सगळं ठेका न चुकवता ??!! तर एकूणच सगळा आनंदी आनंदच !

आणि अशा परिस्थितीत बॅंगलोर मधे आम्हाला - मी, प्रिया आणि काही मित्र मंडळी - रास दांडीया ला जाण्याचा chance मिळत होता ! म्हटलं चला जाऊन तर बघू. पॅलस ग्राऊंड नावाच्या ग्राऊंड वर भव्य मंडप उभारुन रास दांडीया साठी खास सेट उभा केला होता. रात्री ९ पर्यंत पोचल्यास मुलींना free entry होती. आता फ़ुकट कार्यक्रम, फ़ुकट पार्टी, फ़ुकट जेवण (quality जेवण हं!)यावर झडप घालणारे आम्ही साहजिकच free entry साठी कधी नव्हे तो वेळेत पोचायचा आटोकाट प्रयत्न करणार यात तिळमात्र शंका नव्हती. पण पॅलस ग्राऊंड चं मुख्य गेट माहीत आहे असं म्हणवणा-या आमच्या एका हुशार(?) मित्राच्या मागे गोल गोल फ़िरत ९ कधीच वाजून गेले. हो, गोल गोल अश्यासाठी की आम्ही पॅलस ग्राऊंड च्याच भोवती फ़िरत बसलो होतो मुख्य entrance gate शोधत !! :)

आणि एकदाचं ते गेट सापडल्यावर आम्ही आत जाण्याच्या लगबगीत असताना तिथल्या Guard ने आम्हाला अडवलं. ’मॅडम तिकिट ? ’. Free entry ची स्वप्नं बघत आणि मुख्य गेट सापडल्याच्या नादात ९ वाजून गेले आहेत याचं भान राहीलं असतं तर काय !.. झालं .. सगळयांनी रांगेत उभे राहून शिस्तीत्त १५० रु. चं तिकिट काढलं. तिकिट परवडेबल होतं. बॅंगलोर मधे आल्यावर १५० रु. १५रु. असल्यासारखे वाटतात ! असो. तर आत गेल्यानंतर पाहिलं की डावीकडे खाण्यापिण्याचे स्टॉल होते.. आणि उजवीकडे मुख्य रिंगण गरबा खेळण्यासाठी. आत चक्कर टाकली आणि पाहिलं की स्टेज वर छान वाद्यं मांडून ठेवली आहेत.. ड्रम्स, ढोल, तबला, बासरी, key board ..वाटलं.. असतील एखाद्या ऑरकेस्ट्राची. थोड्या वेळाने सगळे बाहेर आलो. म्हटलं जरा खादाडी करावी.. तोच आमचा "डिनर" होता.. पाव भाजी, कच्छी दाबेली, वडा पाव, बर्फ़ाचा गोळा,ऊसाचा रस अश्या पदार्थांची रेलचेल होती. पाव भाजी सोडली तर सगळे पदार्थ rare cateogry मधले होते, rare म्हणजे बॅंगलोर मधे मिळण्याच्या दृष्टीने ! म्हटलं दाबेली, वडा पाव चे प्रयोग नको. पाव भाजी घेऊन पाहावी.. बॅंगलोर मधे आत्तापर्यंत खाल्लेली ती सर्वोत्कृष्ट पाव भाजी होती. खास मुंबई स्टाईल ! मनसोक्त हादडल्यावर आणि गरब्याची गाणी ऐकू यायला लागल्यावर म्हटलं चला CD play केली वाटतं गरब्याची म्हणुन आत गेलो गरबा खेळण्यासाठी. आणि मी पाहातच राहिले. ती गाणी live चालू होती !!! गायक, गायिका, वाद्यवृंद असा सगळा live ऑरकेस्ट्रा होता. (मला हे नंतर कळलं की सगळीकडे दांडीया निमित्त असंच असतं.. recorded CD वगैरे नसते. पण माझ्यासाठी ते नवीन आणि थक्क करणारं होतं.) आणि सगळे इतके तालात सुरात होते की खरंच बाहेरून नुसतं ऐकून recorded गाणीच वाटत होती. रिंगणात सगळं गुज्जू पब्लिक नटुन थटुन आलं होतं आणि सगळे गरबा खेळत होते.. सुरूवातीला आम्ही त्या रिंगणात जायला धजत नव्हतॊ. कारणासाठी पुन्हा पहिला परिच्छेद वाचणे. :) पण मग १५०रु. ची पावती हातात बघताच मुकाट्याने आम्ही एकदाचे रिंगणात सज्ज झालो आणि बाकीच्यांची कॉपी करत ताल धरण्याचा प्रयत्न करत गरबा खेळायला सुरूवात केली. गरबा टाळ्या वाजवून खेळतात आणि दांडीया टिप-यांनी हे मला त्या दिवशी कळलं.

तर खुप वेळ गरबा खेळल्यावर (?) पुन्हा पोटात कावळे ओरडायला लागले. चला ! परत पोटपुजेला आम्ही आपले बाहेर स्टॉल्स कडे कुच केले. यावेळी म्हटलं जरा वडा पाव, दाबेली try तर करून बघू. म्हणुन मी आणि प्रियाने दोघात एक वडा पाव घेतला. १०रु. ला एक. स्वस्तच वाटला. :) वडा पाव serve करताना त्यांनी पावाला गोड चटणी लावली, आणि वडा पाव बरोबर मस्त झणझणीत लसणाची चटणी आणि मीठ लावलेल्या हिरव्या मिरच्या ! बघूनच ’दिल खुष हो गया’ आणि चवीला पण इतका कमालीचा झकास होता वडा पाव की आम्ही लगेचच अजून २ वडा पाव आणि २ दाबेलीची order दिली. आता खरंच अती वाटेल पण दाबेली सुद्धा उत्कृष्ट होती, खास गुजराथी पद्धतीची! खमंग आणि चविष्ट ! झकास हाच योग्य शब्द आहे खरं तर. आम्ही अहमदाबाद च्या किंवा बडोद्याच्या कुठल्या तरी खाऊ गल्लीत आलो आहोत असं एव्हाना वाटायला लागलं होतं आम्हाला !
कारण स्टॉलवाले पण गुज्जु! त्यामुळे ते एकमेकांशी गुजराथीत बोलत होते.
आता जरा desert होऊन जाऊ दे, म्हणुन बर्फ़ाचे गोळे खाल्ले. काला खट्टा,मिक्स,रोझ असे flavours try केले..... अनपेक्षित अशी मनसोक्त आणि मनासारखी खादंती झाल्यानंतर आठवलं अरे आपण दांडीया खेळायला आलो आहोत. :) परत आत गेलो आणि दांडीयाची गाणी सुरू झालेली असल्यामुळे टिप-या हातात घेऊन रिंगणात आलो.(युद्धासाठी सज्ज झाल्यासारखंच वाटत होतं) आम्ही परत कॉपी करत करत तालाचा अंदाज घेत योग्य वेळी योग्य टिपरी योग्य टिपरीला लावत मनसोक्त दांडीया खेळलो. संथ लयीपासून द्रुत लयीकडे कलणारी गाणी अतिशय सुंदर गायली जात होती हे वेगळं सांगायला नकोच !
रात्रीचा १ वाजल्यावर आम्ही सगळ्यांना चला चला म्हणत अक्षरशः रिंगणातून बाहेर खेचत आणलं. आणि घरी निघालो.

असा हा रास दांडीया चा सुरेल, उत्साहमय अनुभव आणि खाऊ गल्ल्या किंवा चटपटीत street food चा आधीच उल्हास असलेल्या बॅंगलोर मधे दांडीया रास(निमित्तमात्र)मुळे आम्हाला मिळालेल्या अश्या अनपेक्षित चविष्ट Treat मुळे ती संध्याकाळ आमच्या आठवणींच्या कोंदणात कायमची कोरली गेली !

-अदिती

Friday, October 16, 2009

उकडीचे मोदक - माझा पहिला वहिला प्रयोग


पुरणपोळी च्या यशस्वी प्रयोगानंतर असाच एखादा खास अस्सल मराठी पदार्थ करावा असं डोक्यात होतं. आणि अनायासे गणेशोत्सव चालू होताच. बॅंगलोर मधे गणेशोत्सव चालु आहे हे विशेष जाणवत नाही. आपलंच तारखेकडे लक्ष असेल तर .. २-३ दिवसांनंतर अनंतचतुर्दशी होती. चला! ठरलं. विसर्जनाच्या दिवशी मोदक तेही उकडीचे करायचे. पण पहिल्यांदाच करणार म्हणुन आधी सॅंपल म्हणुन करुन पहावे असं ठरवलं. पण रोजच्या ऑफ़ीसच्या रुटीन मधे सॅंपल बिंपल करणं बाजुला राहीलं आणि विसर्जनाचा दिवस येऊन ठेपला. माझा उकडीचे मोदक करण्याचा मानस खुपच पक्का होता, त्यामुळे प्रयोग तर प्रयोग अशी बिनधास्त (बिनधास्त कसलं..मनात एक मेजर टेन्शन होतंच, बिनधास्त म्हणायचं ते आपलं स्वत:लाच moral support द्यायला) भुमिका ठेवून मी गुळाचा डबा काढला. नारळ खवूनच ठेवलेला होता. पटाकन सारण करुन घेतलं. म्हणजे कमी टेन्शन असलेली कृती आधीच केली.

आता राहिलेला होता खरा challenging भाग. तांदुळाची पिठी घेतली आणि आईने सांगितल्या प्रमाणे उकड करायला सुरूवात केली.उकड शिजली.गॅस बंद केला पण तरी उकड खूप घट्ट वाटत होती. अजुन मऊसर हवी असं वाटत होतं. आईच्या सल्ल्याने पाणी टाकुन फ़ेरफ़ार बदल केले आणि पटापट मोदक करायला घेतले. पहिला मोदक अगदी सुरेख सुबक नसला तरी मोदक वाटावा इतपत आकार त्याचा नक्कीच आला होता. आपण खुष झालो एकदम आणि मग पटापट पुढचे मोदक करायला घेतले.

जसजसे पुढचे मोदक करायला लागले, तसतसे उकड गार होत असल्यामुळे मोदक वळवायला त्रास व्हायला लागला. एकीकडे ऑफ़ीसची वेळ होत होती. आपली धावपळ होत आहे हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं.
घरी कॅब घ्यायला येते पण मोदक प्रकरणामुळे cab काही आत नशीबात नसणारे असं वाटून मी एका cabmate ला कळवलं की आज मी कॅब ने नाही येणार. केलेल्या उकडीचे एकुण ९ मोदक केल्यानंतर शेवटी थांबले; सारण तसंच ठेवलं. मग मोदक उकडायला लावले. आणि ऑफ़ीस च्या तयारीला लागले. मोदक घेऊन निघाले तेव्हा लक्षात आलं.. नेहमी निघते त्या पेक्षा २० मि. उशीर झाला होता. बाहेर पडले रिक्षा शोधायला.. आणि काय वाटलं कोण जाणे मी cabmate ला फोन केला विचारायला की कॅब निघून गेली आहे का .. कधीतरी चुकून traffic मुळे cab ला उशीर होतो म्हणुन म्हटलं चान्स घ्यावा आणि काय news मिळावी मला !! cab अजुन माझ्या घरावरून पास झालीच नव्हती. मी लगेचच त्याला सांगितलं की मला घ्यायला या मग. अशा प्रकारे मोदक पण झाले आणि cab पण चुकली नाही. मी देवाची भक्त बिक्त असते तर मी म्हणाले असते की ’भगवान ने मेरी सुन ली’(tone जरा filmy style मधे) गणरायानेच कॅब उशीरा पाठवली कारण त्याच्या साठीच नैवेद्य करत होते ना.. :)

ऑफ़ीस मधे पोचल्यावर लगेचच माझ्या मराठी मित्र मंडळींना मी Pantry त बोलावलं. मोदक पाहुन सगळ्यांची कळी खुलली हे वेगळं सांगायलाच नको. तुपाची बाटली पण नेली होती मुददाम. गणपतीच्या काळात उकडीचे मोदक निदान एक एकच का होईना पण खायला मिळाला त्यामुळे जनता खुष झाली. आणि मी तर जाम खुष होतेच !

-अदिती

Friday, October 2, 2009

निलेश मोहरीर साहेब, मानलं बुवा आपल्याला !

गर्द केशरांची फ़ुले आणि सनईचे सूर
सारे असती भोवताली तरी मनात काहूर ॥

स्वप्नात माझिया फ़ुलती दोन केशरांचे दिवे
नव्या वयाचे गुज, रोमरोमी गंध नवे ॥

दिल्या सोडून पाण्यात मी बालपणीच्या होड्या
उंच उंच तो पतंग भोळ्या भाबड्या त्या खोड्या ॥

नव्या दिशा जरतारी एक अनोळखी वाट
त्याच्या माझ्या मनामधे अबोलसा अंतरपाट ॥


सध्या मराठी दूरदर्शन जगतात चालु असलेल्या मालिकांच्या पुरामधे ’अंतरपाट’ ही अजुन एक नुकतीच सुरू झालेली मालिका. आणि इतर मालिकांप्रमाणेच हिला सुद्धा एक अद्वीत,अतुल्य शीर्षक गीत किंवा title song लाभलं आहे; किंबहुना हे म्हणीन की मालिकेचा विषय फ़ारसा नवीन नसला तरी शीर्षक गीत खुपच छान रचलं गेलंय. त्या गाण्यामधे एक वेगळेपणा आहे; freshness(हो, हाच शब्द योग्य आहे.. ताजेपणा वगैरे लिहिण्यापेक्षा)आहे. आता गाण्याचा मुळ बाज अर्थात लग्न, लग्नाळु मुलगी, लग्नाचं वातावरण याच्याशी मिळता जुळता आहे आणि असायलाच हवा, पण तरी निलेश मोहरीर ने ते इतक्या अप्रतीम प्रकारे रचलं आहे की तोडच नाही.
गाण्यातील काही जागा खरंच भाव खाऊन गेल्या आहेत. खास करुन ’माझिया’ मधलं ’या’ म्हणताना ’दिवे’ वरून ’नव्या’ वर येताना किंवा रोमरोमी मधला रोमी म्हणताना, ऐकताना मिळणारा आनंद शब्दातीत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या नंतर background वर येणारा गायकाचा आलाप तर गीताचं सौंदर्य द्विगुणीतच करतो. पुन्हा बेलाच्या आवाजातलं ’दिल्या सोडून पाण्यात’ ह्या शब्दांचे सूर तर कोणत्याही मुलीच्या किंवा व्यक्तीच्या ...असं म्हणणं जास्त योग्य ठरेल... ह्रदयाला हात घालतात. आणि ’उंच उंच तो पतंग भोळ्या भाबड्या त्या खोड्या ... नव्या दिशा जरतारी एक अनोळखी वाट ’ हा patch तर हे गाणं अद्वीत होईल याची काळजी घेतो. आणि ’अंतरपाट’ हा शब्द शेवटी गायला जातो त्या क्षणी सुरावटींच्या सुखद सुंदर प्रवासानुभवातून जाऊन आपण मंत्रमुग्ध झालेलॊ असतो. फ़क्त एवढंच की गाणं डोक्यात register होण्यासाठी २-३ दा तरी ते लक्षपुर्वक ऎकायला हवं.
प्रत्येक मुलीमधे दडलेली निरागसता, मिश्किलपणा, फ़क्त स्वत:शी साधलेला संवाद, मनाशी असलेला प्रामाणिकपणा या सगळ्याची पुरेपूर आठवण हे गाणं ऎकताना होते.. निदान मला तरी झाली.

निलेश मोहरीर ने या आधी ’कळत नकळत’ आणि ’कुलवधु’ या मालिकांची शीर्षक गीतं रचली आहेत.’कळत नकळत’ हे वैशाली सामंतने म्हटलं आहे आणि ’कुलवधु’ वैशाली माडेने गायले आहे. आणि आता हे ’अंतरपाट’ गायलंय बेला शेंडेने. ही तिन्ही गाणी इतकी वेगळी,तोडीस तोड आणि गोड सुरावटींची आहेत... आणि या तिन्ही गायिकांनी देखील ह्या गाण्यांना योग्य न्याय दिला आहे. निलेशने सुद्धा प्रत्येक गाणं वेगळ्या गायिकेला देऊन आपलं वेगळेपण जपलं आहे. म्हणुनच म्हटलं मोहरीर साहेब, मानलं बुवा आपल्याला !

-निलेश ची नवीन फ़ॅन
अदिती

Monday, July 27, 2009

फोटोग्राफ़ीचं ऊत कारण ऑर्कुट,फ़ेसबुक चं भूत !

"ए वाव, कसले सही फोटो आहेत, मी आजच ऑकुट वर लावते"

"कूल... फ़ेसबुक साठी आयडिअल आहेत हे पिक्स"

हे असे डायलॉग आता काही नवीन नाहीत.
परवा आम्ही सगळे बोटॅनिकल गार्डन बघायला गेलो होतो. आता बोटॅनिकल या शब्दातूनच जाहीर आहे की वेगवेगळ्या प्रकारची, रंगांची, आकारांची सुंदर फ़ुले आपल्याला पाहायला मिळणार. त्या मुळे बागेत शिरल्या शिरल्या एक कटाक्ष टाकताच अतिशय सुंदर दृश्याने डोळे दिपून गेले..जिकडे तिकडे रंगीबेरंगी फ़ुलं, त्याच्या जोडीला हिरवीगार झाडी... प्रत्येक फ़ुलझाडाचं नाव, त्याची माहीती अगदी व्यवस्थित. पण आपलं लक्ष कुठे असतं ...तर कोणत्या बॅकग्राऊंड वर ग्रुप फोटो छान येईल.. आणि कोणत्या फ़ुलांबरोबर आपला individual snap छान येईल.. काय करायचंय ग्रुप फोटो किंवा individual snap घेऊन? तर.. ते लावायचे आहेत ऑर्कुट वर... कोण बघणार ते फोटो.. तर फ़क्त ऑर्कुट मार्फ़त संपर्कात असलेली so called मित्र मंडळी.. कारण जवळच्या लोकांना आपण either पिकासा चं invitation पाठवतो किंवा डायरेक्ट attach करून पाठवतो...नाही का ! आता मग पुढचा प्रश्न हा की मग फोटो काढायचेच नाहीत का, किंवा फ़ेसबुक, ऑर्कुट वर लावायचे पण नाहीत का... फोटो जरूर काढायचे...ऑर्कुट वर पण जरूर लावायचे ..
पण ज्या ठिकाणांचे फोटो घेऊन किंवा ज्या ठिकाणांच्या बॅकग्राऊंड वर स्वतःचे फोटो घेऊन तुम्ही आठवणींची साठवण करत आहात त्या जागेचा भरभरून निदान आनंद तरी घ्या !!
हिरवे तपकिरी डोंगर, गार वारा, पक्षांचा मंजूळ आवाज, निळंशार पाणी, पावसाची रिमझिम, समुद्राच्या लाटांची खडकांवर झेप, सुर्याच्या किरणांमुळे झालेलं विविध रंगछटांनी माखलेलं आकाश हे सगळं प्रत्यक्षात अनुभवण्यात एक वेगळी मजा आहे ...खरंच फोटोंमधून तेवढी मिळते का मजा ? किंबहुना त्या सुंदर निसर्गाचा आनंद घेताना मधे मधे इकडे फोटो तिकडे फोटो करता करता निसर्गाची मजा राहते बाजुला.
आता ही गोष्ट वेगळी की फोटोग्राफी हाच हेतू ठेवुनच आपण काही ठिकाणांना भेट देतो. ते वेगळं.पण इतरवेळी आपण
आपल्याकडे कॅमेरे आहेत हे जरा विसरून डोळ्यांच्या कॅमेरात हा निसर्ग टिपून बघितला तर माझी खात्री आहे त्या आठवणी पण आपल्या ह्र्दयात कायमस्वरुपी साठवण बनून राहतील.

आपल्या साठी फोटो आहेत, फोटॊंसाठी आपण तर नाही ना !

- अदिती

Friday, July 17, 2009

चविष्ट रविवार

रविवारी सकाळी ब्रेकफ़ास्ट किंवा दुपारच्या जेवणाच्या च्या निमित्ताने कोणाच्या तरी घरी जमून गेट टुगेदर करणे काही नवीन नाही.. त्यात सर्वात महत्वाचा रोल असतो खाद्य पदार्थांचा जे अर्थात त्या घरातल्या मुलीने/बाईने केलेले असतात किंवा फ़ार फ़ार तर बाहेरुन मागवलेले असतात. पण मागच्या रविवारी मात्र आम्हाला ब्रेकफ़ास्ट आणि दुपारचं जेवण चक्क आमच्या २ मित्रांच्या हातचं मिळालं.
MS करायला US ला निघालेल्या आमच्या अभिषेकच्या हातचे चविष्ट पोहे आता मिळणार नाहीत म्हणुन हळ्हळणाऱ्या आम्हाला पाहून सदगदीत झालेल्या अभी ने आम्हाला उत्साहाने रविवार सकाळी पोहे पार्टी चे आमंत्रण दिले ! आम्हीही पुन्हा चविष्ट पोहे मिळणार म्हणुन (की रविवार च्या नाष्त्याची सोय झाली म्हणुन :) ) खुष झालो. आणि अगदी रविवारी भल्या पहाटे ९.३० ला आम्ही अभिषेकच्या घरी जाऊन धडकलो..
साहेबांसाठी आमचा आवाज हा alarm होता म्हणजे थोड्क्यात अजुन त्यांची सकाळ सुरुही झालेली नव्हती.. पण लगेचच घाईघाईने कांदा, पोहे, मिरची, कोथिंबीर, लिंबू इ. सामान आणुन एखाद्या सुगरणीसारखी जय्यत तयारी सुरू केली.
आणि मग पटापट आम्हा ८-९ लोकांसाठी मस्तं पोहे केले.. आमच्या एका मैत्रीणीची-प्राचीची मदत घेतली थोडी.. पण तेवढी cheating चालते ! :)
अशा प्रकारे श्री. सुगरणाच्या हातच्या गरमा गरम पोह्यांवर कोथिंबीर पेरून, शेव भुरभुरून त्यावर मग मस्तं रसदार लिंबू पिळून आम्ही त्या पोह्यांवर ताव मारला.
त्या नंतर आमच्या ग्रुप मधे असलेल्या एकमेव सरदारजी ने त्याच दिवशी दुपारी आम्हाला "दावत" दिली होती जेवणाची. त्याने चक्क स्वतः तयार केलेल्या भाज्या म्हणजे : बेंगन भरता आणि राजमा , तोही १० जणांसाठी !!
मी आणि प्रिया, पराठे आणि रायता करणार असं आधीच ठरलं होतं !
घरी पोचल्या पोचल्या पाजी ने बेंगन भरता आणि राजमा टेस्ट ला दिला आणि ती चव चाखून आमचा विश्वासच बसेना की ते खरंच त्याने स्वतः केलं आहे !!! इतक्या अप्रतिम झाल्या होत्या दोन्ही भाज्या की खरंच शब्द नाहीत.
मसाले, ग्रेवी एकदम परफ़ेक्ट !
दुपारी २.३० वाजता अक्षरशः बोटं चाटत आम्ही सगळा स्वॆपाक फ़स्त केला !
त्याचा परिणाम हा झाला की रात्री जेवणाची गरज पण भासली नाही..

अशा प्रकारे हा रविवार चविष्ट झाला तो २ Mr. सुगरणांमुळे !!

बदलला की नाही जमाना खरंच ! :)

- अदिती

Wednesday, July 1, 2009

Little champs तुमची आठवण येते तेव्हा ... !

पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा...
सुरत पिया की....
मी हाय कोळी ...
ढीबाडी ढीपांग ...
लागा चुनरी में दाग ...
अहो सजणा ...

लक्षात आलेच असेल मी वर हीच गाणी का लिहीली आहेत. ही आहेत आपल्या लाडक्या Little champs नी सा रे ग म प च्या मंचावर गायलेली गाणी .. आज ती सगळी गाणी कुठेही लागली तरी आपल्याला ते ५ जादूगारच आठवतात..
आजही अजित परब ने बगळ्यांची माळ फ़ुले गाणं सुरू केल्यावर प्रथमेश आठवल्या शिवाय राहात नाही. मधुरा अहो सजणा म्हणत असली तरी आपल्याला मात्र आर्या ला मिळालेला once more च आठवतो.
आत्ता पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, सुरत पिया की, मी हाय कोळी ही अवंती आणि प्रथू च्या आवाजातली mp3 ऐकत होते आणि परत मी त्या मागच्या Little champs च्या जगात गेले. म्हणुन हे लिहावसं वाटलं ...
५ चिमुकल्यांनो, आमच्या ह्र्दयात तुम्ही कायमचं स्थान निर्माण केलंय ... परत या ना भेटायला... !

Friday, March 6, 2009

आणि एकदाची ही सकाळ संपली !

रोज ऑफ़ीस मधे आल्यावर संध्याकाळची वाट बघणे किव्वा दिवस कधी संपेल असं वाटणे साहजिक आहे, पण सकाळी सकाळी ही सकाळच संपावी असं जर कधी वाटलं तर नक्कीच ती सकाळ मन:स्ताप देणारी असली पाहिजे, नाही का ? फार कोड्यात बोलत नाही. आजची सकाळ कशी विशेष ठरली हे सांगण्यासाठी वरची प्रस्तावना !

काल रात्रीच स्वैपाक करताना एक आपत्ती आली ती म्हणजे गॅस संपला. वरण भात झाला होता, पण पोळ्या आणि चवळीची उसळ करायची राहिली होती. माझ्याकडे ५ कि. चा छोटा गॅस असल्यामूळे स्वत: जाऊन refill करण्या शिवाय़ पर्याय नव्हता. home delivery पद्धत उपलब्ध नाही. सकाळी उठल्या उठल्या दात घासण्यासाठी नळ उघडल्यावर अजुन एक शुभवार्ता कळली, ती म्हणजे नळाला पाणी नाही. नळाला पाणी नसणं ही काही जगावेगळी घटना नाही म्हणुन येईल थोड्या वेळात असं म्हणुन माझ्या regular morning walk (कालच सुरु केला, ही गोष्ट वेगळी !) ला खंड पाडून मी गॅस refill च्या मॊहिमेवर निघाले. (of course दात घासुन, पाण्याचा back up असतो नेहमी घरात). तंगड्या तोडत गॅस च्या दुकानात गेले आणि भरलेला जड गॅस घेउन हाश्य हुश्य करत घरी पोचले. मोटर चा आवाज येत होता. चला, म्हणजे पाणी वर चढतंय!! सुटकेच नि:श्वास टाकला. तळमजल्यावर घराचे owner राह्तात. त्या आंटींना सुद्धा विचारुन खात्री करुन घेतली. घरी गेले आणि समजलं पाण्याचा अजुनही पत्ताच नाहीये. माझ्याकडे एकच तास शिल्लक होता कारण त्या नंतर मला ऑफ़ीस होते. स्वैपाक, भांडी, कपडे, आंघोळ सगळ्याचीच बोंब होती. परत खाली गेले आंटींकडे , त्या म्हणाल्या, टाकीत पाणी, पडतंय थोडं अजुन पडलं की मोटर चालू करते. मला ok म्हणण्या शिवाय पर्याय नव्हताच ! पुन्हा झक मारत वरती गेले घरी. आणि काय नशीब ! विद्युत मंड्ळाने माझ्या वर क्रुपा केली होती. नाही, उद्दिष्ट चांगलं होतं त्यांचं, विजेची बचत, पण त्या क्षणी ती बचत मला खुप महागात पडत होती. आता लाईटच नाही म्हटल्यावर मोटर काय डोंबल सुरू करणार ! झालं ! पुढचा अर्धा तास माझ्या डोळ्या समोर उभा राहीला. थोडी भांडी पड्लेली, लॉंड्री बॅग मधे कपडे आणि माझी आंघोळ, सगळाच आनंदी आनंद ! पाण्याचा back up बादलीत ठेवला होता. पण गरम पाणी गिझर मधुन मिळतं आणि त्या साठी लाईट असावे लागतात. हे सगळं माझ्या नशीबात त्या क्षणी तरी नव्हतं, म्हणून धबधब्याच्या गार पाण्यात आपण मस्तं भिजत आहोत अशी कल्पना करत गार पाण्याने आंघोळ पार पाडली. लाईट आणि पाणी दोन्ही नसल्यामुळे स्वैपाक करायचा प्रश्नच नव्हता. म्हणुन परत आंटींकडे गेले. त्या आणि मी दोघीही रिकाम टेकड्या, निदान काही वेळ, म्हणुन बसलो दोघी चहा पीत. आंटींच्या हातचा चहा म्हणजे अगदी अमृत, त्यामुळे दुष्काळात पाण्याचा थेंब मिळावा तसं झालं. आणि त्यात आंटींनी गरम गरम छोले माझ्या पुढ्यात ठेवले. म्हणाल्या, आता कुठे काही करत बसते, हेच घेउन जा डब्यात ! चला ! आंटींचे आभार मानून मी घरी परतले. भाताचा कुकर लावला , म्हटलं, आज पंजाब्यांसारखा छोले राईस खावा ! आता मी काल पासुन भिजवलेल्या चवळीचं काय करायचं हा प्रश्न होता. भरीत भर म्हणजे, माझ्याकडे फ़्रीज नाही, सो मला चवळीचं काहीतरी मार्गी लावणं must होतं. त्या उरलेल्या १० मि. मधे पटाकन चवळीची उसळ करून टाकली. संध्याकाळची सोय झाली. आता आज दोन्ही वेळेला कडधान्यं. चायला, कधीच मी कडधान्यं भिजवत नाही, भिजवली ती अश्या ऐतिहासिक दिवशी ! तर अश्या रितीने ही सकाळ एकदाची संपली !
- अदिती

Followers