Monday, September 8, 2025

आई

Friday, October 11, 2013

लिफ्ट मधे माणसं शिरतात तेव्हा...


लिफ्ट  मधे माणसं शिरतात तेव्हा...

लिफ्ट मधे माणसं शिरतात तेव्हा...ही माणसं म्हणजे ना... आई शप्पथ काय सांगू तुम्हाला कसला गोंधळ घालतात !! तसं आम्हाला लिफ्ट प्रकार वापरण्याचा योग येतच नाही म्हणा... भिंत आणि लिफ्ट मधली फट हीच आमची लिफ्ट. त्यातून झरकन धावत आम्ही मजले पार करतो रोज.. तुरुतुरु, दुडूदुडू अशी विशेषणं देखील आम्हाला याच माणसांनी दिलीयेत. असो. तर मुद्दा काय की परवा मला सोसायटी मीटिंग साठी वरच्या मजल्यावर श्री. सरडे यांच्याकडे जायचे होते.  सौ. पालकर, श्री. झुरळे आणि कधी नव्हे तो Miss चिचुंद्रे  सुद्धा येणार होत्या. आता असा Golden chance मी सोडणार होतो होय! फक्त मनात आलं आज जरा या माणसांची Lift वापरून बघू ४ मजले धावण्यापेक्षा. म्हणून लिफ्ट ची फट उघडण्याची वाट बघत बसलो. १०मिनिटातच फट उघडली. कोणी २-३ माणसे शिरली.  

 तसं मी पण चपळपणे झरकन आत शिरलो. २ सेकंद झाले नाही आणि जोरजोरात किंचाळण्याचा आवाज यायला लागला. मी पण बावचळून इकडे तिकडे बघायला लागलो तर १ मुलगी आणि २ काका, काकू होते. जोरजोरात ओरडणारी तीच मुलगी होती. आणि ते काका मजेशीर होते. मुलगी किंचाळतेय आणि ते मात्र हसत होते फिदिफिदी. पुढच्या १० सेकंदांत काय झाले कळले नाही, ती मुलगी उड्या मारायला लागली. आणि किंचाळणे चालूच. आणि काही केल्या मला कारणच कळत नव्हते. अचानक झाले काय हिला! हिच्या उडयांपायी मी घाबरलो, म्हटलं हिचा पाय माझ्या शेपटीवर जरी पला तर वाट लागायची म्हणून मी पण आपला उड्या मारायला लागलो. उड्या म्हणजे काय आपलं Favourite काम. झालं! ती मुलगी आणि मी एकमेकांना Competition देत उडया मारतोय. आता ती मुलगी भलतीच घाबरली. किंचाळणं अधिक कर्कश्य झालं होतं. 

त्या काकू बिचा-या शांत उभ्या होत्या. पण ही बया! हिच्या ह्या विचित्र प्रकारांमध्ये त्या काकूंना धक्का लागून कधी त्या पडल्या हे कोणाला कळलंही नाही तेव्हा अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली.. ही मुलगी मला घाबरून एवढा थयथयाट करतीये हो$$य !! वा..! आपल्याला कोणी एवढं घाबरू शकतं!! एवढा वट आहे आपला?!? ह्या कल्पनेने एवढ्या गोंगाटातही गुदगुल्या झाल्या आणि अभिमानाने कॉलर ताठ झाली. अजून काही व्हायच्या आत नशीब ४था मजला आला. दरवाजा उघडला आणि मी सुटलो.  
बाहेर निघताना मला ऐकू आले 'अदिती, चल बाहेर लवकर, कहर केलास ओरडून ओरडून'. तर अदिती नाव होते तिचे. माणसाने किती घाबरट असावं याची काही सीमा की खरंच मी लोकांना एवढा घाबरवू शकतो असा विचार करतच आमच्या नेहमीच्या रस्त्याने मी सरडेंकडे प्रस्थान केले. 

हुश्य!! नको रे बाबा$$ ही माणसं नकोत, यांची लिफ्टही नको. आम्ही बरे आणि आमची सुपरफास्ट लिफ्ट बरी असे म्हणत मी सरडेंकडे पाऊल ठेवत नाही इतक्यात समोर Miss चिचुंद्रे दिसल्या! 'Mr. उंदरे तुम्ही!?'  या त्यांच्या शब्दांनी पुन्हा गुदगुल्या झाल्या आणि एवढ्या धावपळीचं सार्थक झालं असं म्हणत आपोआप माझ्या चेह-यावर स्मितहास्य उमटलं! 




Friday, May 31, 2013

चश्म-ए-बद्दूर पुन:श्च होणे नव्हे!

  नाही, मी चश्म-ए-बद्दूर गाणं नव्हे तर सिनेमा बद्दल बोलतेय! चश्म-ए-बद्दूर नावाचा एक नवीन सिनेमा आलाय एवढंच मी ऐकलं होतं आणि परवा कळलं की हा जुन्या चश्म-ए-बद्दूर चाच  Remake आहे!! बघायची इच्छा तर सोडाच पण मला ही संकल्पनाच नाही आवडली. Remake ह्या संकल्पनेशी काही माझं वाकडं नाही पण चश्म-ए-बद्दूर सारख्या क्लासिक सिनेमाचा Remake?! ये बात कुछ हजम नही हुई. 

                                   चश्म-ए-बद्दूर च्या इतक्या सुंदर आठवणी आहेत. त्या तिघांची ची ती दिव्य रूम, त्यातले एकसे एक पोस्टर्स, सिद्धार्थ चा सीधे पणा, ओमी ची शायरी, रवी ची cute टपोरीगिरी, ते पान टपरी वाले लल्लन मिया, मिस चमको, तिचं लोभस व्यक्तिमत्व, प्लंबर, फिल्म डिरेक्टर scene,  १० रु. चं passing the parcel, tootyfruity icecream वाला वेटर, त्या गोड आजीबाई, खोट्या मारामारीच्या plan मधली खरीखुरी मारामारी आणि मग गोड शेवट हे सगळं मनात इतकं घर करून बसलंय ना की पुन्हा तोच सिनेमा हजारदा पाहू; पण नवा जमाना म्हणून नव्या लोकांना ह्या सगळ्या मस्त कलंदर व्यक्तिरेखांमध्ये बसवून पुन्हा तो  उत्कृष्ठ दर्जा, तो innocence, ती अभिजात विनोदी दृश्य (जमली असली तरी) नाही बुवा आम्हाला पहायची .. का कोण जाणे .. :) 


Monday, May 6, 2013

बिन पिकलेला आंबेवाला

                                 मागच्या रविवारी भर दुपारी चांदण्यात मंडई,  तुळशीबाग इ. ठिकाण ची pending कामं करून परत जात असताना मला एक आंबेवाला दिसला. रस्त्यावरच boxes घेऊन open दुकानच थाटलेलं  जणू. यंदा आंब्यांचे 'असे' stalls खूप दिसताहेत. Stalls कसले, ना त्याला काही छप्पर, ना भिंती. म्हणूनच अश्या ठिकाणाहून आंबे तेही हापूस घ्यावे की नाही हाही प्रश्नच पडतो. तर हा आंबेवाला मात्र कमी पिकलेला, आपलं... कमी वयाचा होता.   ७-८ वर्षांचं पोर. भर दुपारी २ ला आंबे विकत उभं! ना तिथे सावली, ना विसावायला जागा. होतं ते फक्त रणरणतं ऊन. खेळण्याच्या किंवा आईच्या हातचा गरमागरम वरण  भात खाऊन झोपी जाण्याच्या वयात हा अर्धा जीव मात्र घरच्या जबाबदारीमुळे अकाली मोठा होऊन चिटपाखरुही नसलेल्या, ग्राहक मिळण्यास प्रतिकूल अश्या त्या निर्जन रस्त्यावरही  ठाण मारून होता.

ते दृश्य पाहताक्षणी माझी नजर तिथेच हबकली. आपोआप माझी गाडी तिथे येऊन थांबली.  खरं तर  २ एक डझन आंबे घेऊन त्याचे तिथे उभे राहिल्याचे अगदी सार्थक नाही तरी निदान त्याला थोडेसे समाधान मिळवून देणे हेच योग्य दिसत होते. पण २-४ नोटा मिळवून देण्यापेक्षा त्या क्षणी त्याला थंडगार लिंबू सरबत देणे मला जास्त रास्त वाटले.  ५मि. अलीकडे असलेल्या नीरा विक्री केंद्राच्या दादांकडून सरबत आणि थंड पाण्याची बाटली घेऊन त्या छोट्याकडे गेले.
"सरबत आवडते का लिंबाचे?"
"अं ...? नाही, नको"
"आई रागावेल?"
(ओठावर मंद हसू आणि नजर खाली)
"की हे नक्की सरबतच आहे की अजून काही असा विचार करतोएस?"
(मान नकारार्थी हलवून पुन्हा गप्प!)
(मी स्वत: एक घोट पिऊन )"झाले आता समाधान?  घे पाहू बरं आता चटकन!"

थोडसं बिचकतच त्याने ते सरबत घेतलं.
(त्याच्या कडे गार पाण्याची बाटली सुपूर्त करताना)
"बरोबर कोण नाही का तुझ्या आंबे विकायला?"
"पप्पा हायेत.  जेवायला गेलेत."

हसून त्याचा निरोप घेऊन निघाले. जरासे ऊन लागले की Mango juice, उसाचा रस, लिंबू सरबत अन काही नाही तर घरी जाऊन full speed fan नाहीतर AC, इतक्या सहजपणे options ठरवणारं माझं मन मात्र या छोटू साठी एवढं(च) केल्याची खंत आणि  एवढं(तरी) केल्याचं समाधान अश्या मिश्र भावनांमधेच घुटमळत राहिलं.



Monday, January 9, 2012





My predictions on Filmfare award winners '2011:

Best Director: Imtiaz Ali/Zoya Aktar
Best Actor: Ranbir Kapoor
Best Actress: Vidya Balan 
Best actor in a supporting role : Farhan Aktar for ZNMD

Best Editing: Dhobi ghat
Best Special Effects: Ra.One
Best Dialogues: Rockstar

Best playback singer: Mohit Chauhan for Tum ho - Rockstar

RD Burman Award : Ajay-Atul for Singham

Best female debut: Poorna Jagannathan for Delhi Belly





Monday, January 2, 2012

रिक्षा on demand!

पाषाण.. मुख्य पुण्यापासून थोड्या आडभागात असलेला एक शांत, सुंदर परिसर.. पूर्वी नावाप्रमाणेच इथे फक्त पाषाण म्हणजे अर्थात टेकड्या असाव्यात कारण आता वस्ती निर्माण झाल्यानंतरही आजूबाजूला अनेक डोंगर, टेकड्या दिसतात. पाषाणची टेकडी ही त्यांपैकीच एक अशीच प्रसिद्ध टेकडी! एका घराच्या  खिडकीतून दुस-या घरातल्या स्वैपाकघरातल्या भांड्याचे ढीग दृष्टीक्षेपात आणणा-या खिडकीची चौकट बघण्याचे दिवस अजून आले नाहीत इथे, आणि अर्थात.. येऊही नयेत हीच इच्छा.. :) तर अश्या या पाषाण भागात गरजेच्या वस्तूंची दुकानं, सुपर मार्केट्स तर आहेतच पण आजूबाजूच्या औंधसारख्या भागांमध्ये इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या शोरूम्स, विविध restaurants, cafes, malls इ. वैविध्यपूर्ण ठिकाणं असल्यामुळे हा भाग जलद गतीने प्रगत आणि परिपूर्ण होतोय जेणेकरून 'गावात' जायची गरज पडत नाही. गावात म्हणजे पुण्यातला मुख्य बाजारपेठेचा भाग डेक्कन, मंडई इ. भाग अभिप्रेत आहे.


अश्या या प्रदूषणमुक्त, हवेशीर भागात एक अडचण मात्र जाणवते, ती म्हणजे रिक्षांची. पुण्याची एकच काय ती खात्रीची Local transport सेवा! पण सकाळी ८ च्या आधी आणि संध्याकाळी ८ नंतर रिक्षा मिळणे कठीण.. त्यामुळे स्वत:चं वाहन असल्याखेरीज हिंडणे अवघड. तशी पुणेकरांना आपली फटफटी काढली आणि निघाले अशी सवय नक्कीच आहे, पण स्टेशन किंवा बस stand ला बाहेरगावी जायचे असल्यास कोणालातरी सोडायला जावेच लागते. एवढी प्रस्तावना देण्याचं कारण म्हणजे या अडचणीवर तोडगा आज निघाल्यामुळे मला भयंकर आनंद झाला. आजच सकाळी मला प्रगतीने मुंबईला यायचे असल्यामुळे मला ७.१५ वाजता निघायचे होते. आई, बाबा दोघंही नेमके सकाळी मोकळे नव्हते. मग बाबांनी university circle पर्यंत किंवा रिक्षा मिळेपर्यंत सोडायचं असं ठरलं. पण नशीब चांगलं की निघाल्या निघाल्या कॉर्नरलाच रिक्षा मिळाली. ते काका भलतेच बोलके होते.. बोलता बोलता मी सहज विचारलं की फोन करून बोलावलं तर तुम्ही येता का.. म्हणजे रिक्षा service द्यायला..  तर त्यांचं उत्तर होतं - 'हो तर. अहो ताई, पाषाण मध्ये बरेच रिक्षावाले असंच करत्यात. आम्हालाबी कळते न तुमची गैरसोय होते ते. तुमची गरज आणि आमची पण, नाही का.. ह्या ह्या ह्या! घ्या नंबर लिवून घ्या, रिक्षावाले बाळूकाका असं नाव लिवा.. दिवसा हवी असंल तर १ तास आधी फोन करा.. मध्यरात्री किंवा पहाटे हवी असेल तर जरा एक दिवस आधी फोन करा' , म्हटलं वा, हे लई बेस झालं! आणि जेवणाची ऑर्डर एके ठिकाणी पोचती करायला आमच्या मातोश्रींनी त्वरितच या काकांना फोन करून बोलावून घेतलं.. आणि ह्या सेवेचा फायदा करून घेतला. म्हणजे service ची trial पण झाली.. अश्या प्रकारे नवीन वर्षाच्या पहिल्या 'working day' ची सुरुवात अश्या नवीन कल्पनेने झाली. तसं इतरांना 'त्यात काय एवढं' असं वाटण्याची शक्यात आहे पण अश्या या गैरसोयीला थोड्या प्रमाणात का होईना बांध घालता आला किंवा येईल याचाच आम्हा पाषाणकरांना  आनंद! 


- अदिती 

Tuesday, November 1, 2011

मुंबई .. माझ्या नजरेतून (२)

मुंबई मला active वाटते; fast पेक्षा. निदान 'धोबीघाट' सिनेमात दाखवल्या प्रमाणे fast forward command मिळाल्यासारखे लोक माझ्या आसपास नाहीत आणि तसं आयुष्यही वाट्याला नाही. पण मुंबई चा activeness किंवा activeता ;) मला अगदी क्षणोक्षणी दिसते, जाणवते. पहाटे ५ वाजताची वेळ असो किंवा रात्री १२ ची. मुंबईत सामसूम तर बघायला मिळतच नाही; उलट अश्या अपवेळेला सुद्धा मुंबई active असते. आता active active  म्हणजे काय; तर रिक्षावाले, Taxi वाले , सायकलवाले, bike वाले, कार वाले अश्या सगळ्यांची जा ये चालू असते. अंडा भुर्जी, ऑम्लेट पाव, डोसा, बिर्याणीच्या गाड्यांपासून posh hotels, restaurants सगळं अगदी व्यवस्थित सुरु असतं. स्टेशन्स वर तर अक्षरश: गर्दी असते. पायी फिरणारे असतात ते वेगळेच. अर्थात अगदी पहाटे किंवा रात्री उशिरा याचं प्रमाण नक्कीच कमी असतं. पण अगदी सामसूम नसते. ही एक महत्वाची आणि वेगळी गोष्ट मी note  केली. उशिरापर्यंत खास करून मुलींनाही मी भटकताना पाहिलंय! रिस्क तर सगळीकडे आहेच, पण त्या मानाने इथे भीती कमी वाटते.

मुंबईचा 'मार्केट' हा जाम interesting प्रकार आहे.  नाही, मार्केट ला जाणे म्हणजे इतर शहरांमध्ये करतो त्याप्रमाणे अगदी भरपूर प्लान करून, कामांची यादी करून  जायची गरज नाही. मुंबईत मार्केट म्हणजे अक्षरश: गल्लोगल्ली आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती नाही वाटणार. खास करून स्टेशन च्या बाहेर असलेली मार्केट्स म्हणजे पेन च्या re-fill  पासून home theatre पर्यंत च्या सगळ्या दुकानांनी भरलेली असतात. कधी लक्षात येणार नाहीत अश्या काही इंटरेस्टिंग, उपयुक्त, कल्पक वस्तूही अश्या मार्केट्स मध्ये हमखास आणि स्वस्तात मिळतात. दुकानंच नव्हे तर छोटे टपरीवजा stalls नाहीतर अक्षरश: टेबल वर वस्तू मांडून आपलं 'दुकान' थाटणारे लोक हे मुंबईकरांच्या गरजा फार चांगले ओळखून आहेत. पेन, मोजे, बेल्ट्स, रुमाल अश्या रोजच्या लागणा-या आणि वेगळं जाऊन विकत घ्यायला वेळ नसलेल्या वस्तू  स्टेशन च्या बाहेर रोजच्या येण्या जाण्याच्या वाटेवर मिळतात. लोकांना बरं आणि विक्रेत्यांना पण!


मुंबईच्या लोकल ट्रेन्स मधली खरेदी हा या माझ्यासाठी या सगळ्यापेक्षा जास्त कौतुकाचा भाग आहे. लोकल्स मधला बोरीवली-चर्चगेट, CST-कल्याण, चर्चगेट-विरार असा मोठ मोठा प्रवास लक्षात घेता विक्रेत्यांनी तिथेही आपलं विश्व (आणि गि-हाईक) निर्माण केलंय. कानातली, गळ्यातली इ. Ladies Accessories पासून  File होल्डर, कार्ड होल्डर, पेन्स, पुस्तकं, लहान मुलांसाठी चित्र पुस्तिका, रंग, रुमाल, Napkins, चादरी  या आणि अश्या अनेक विविध उपयोगी आणि interesting वस्तू माफक दरात मिळतात. आणि हो, त्याच्या quality बद्दल  जराही शंका बाळगू नका. निदान त्यावर जितके पैसे खर्च करतो त्या मानाने तरी त्या ब-याच टिकतात. स्वानुभवावरून सांगतेय ;). असे हे लोकल मधले mobile मार्केट हे सगळ्यांच्या मनात स्थान करून आहे. निदान ज्यांना अश्या खरेदीची आवड आहे त्यांच्या!


मुंबईकरांच्या सकाळी ६ ते रात्री ११  च्या non-stop, busy दिनचर्येमध्ये सगळ्यांनाच नाश्ता, जेवणाचे डबे बरोबर घेऊन जायला जमत नाही. त्यामुळे ही गरज ओळखून चणे, फुटाणे, दाणे पासून वडापाव, मिसळ, राईस-प्लेट पर्यंत सगळं काही सगळ्या स्टेशनबाहेरच्या  मार्केट्स मध्ये  मिळेल याची काळजी या हॉटेल वाल्यांनी आणि विक्रेत्यांनी घेतली आहे. आणि अशी हॉटेल्स फक्त स्टेशन बाहेर नसून जवळ जवळ प्रत्येक गल्लीत आहेत. त्यामुळे, स्टेशन च्या बाहेर, कोणत्या तरी कंपनी  च्या गेटबाहेर, भाजी मार्केट बाहेर, अगदी भर चौकात कुठेही लोक उभ्या उभ्या खाताना दिसले तरी नवल नाही!

आता विषय निघालाच आहे म्हणून आठवलं, आम्ही चर्चगेट ला काला घोडा फेस्टिवल ला गेलो होतो. तेव्हा शेवटच्या दिवशी रविवारी भटकत भटकत आम्हाला तसा उशीर झाला. रात्री १०.३० च्या आसपास आम्ही चर्चगेट  ला होतो. आणि चर्चगेट म्हणजे खास offices चीच colony. आजूबाजूला सगळी offices च offices. त्यामुळे त्या भागात उशिरा पर्यंत चालणारी हॉटेल्स कमी आहेत आणि आम्हाला तर जाम भूक लागलेली. काय करायचं अश्या विचारात असताना अचानक आम्हाला खमंग ऑम्लेट  चा वास आला. समोर पाहिलं तर एक ऑम्लेट पाव ची गाडी होती! तिघींना एकाच वेळी मोह झाला आणि एकीने त्याच्या 'Quality' ची लगेच हमी दिली की गाडीवरचं असलं तरी हरकत नाही. ब-याचदा ऑफिसला उशीर झाला की अनेक लोकांचा हाच हक्काचा 'dinner' असतो. आम्ही लगेचच ऑम्लेट पाव order केले. चव झक्कासच होती, हे वेगळं सांगायला नको. Flora fountain च्या बाहेर असलेला बेंच म्हणजे आमचा सोफा आणि टेबल म्हणजे  हात, अश्या थाटात आमचं जेवण पार पडलं. मग त्या नंतर समोरच एका juice वाल्याकडून वेगवेगळी ३ juices  घेतली. आता झालं संपूर्ण जेवण! तर सांगण्याचा मुद्दा हा की मुंबईत तुम्ही कुठेही, कधीही असा; तुम्हाला उपाशी राहावं लागणार नाही.

अशी ही मुंबई.. जितकी मोठी, तितकी समजायला सोप्पी, जितक्या चिडवणा-या  गोष्टी इथे,  तितक्याच सुखदायी सुद्धा! कितीही फिरा..संपत नाही, मुंबई Exploration ची उत्सुकता काही कमी होत नाही! :)



- अदिती 




Friday, September 23, 2011

मुंबई .. माझ्या नजरेतून (१)

            लहानपणापासून मी मुंबई बद्दल आई बाबांकडून ऐकत आले आहे. ३ री  पर्यंत डोंबिवलीत राहण्याची संधी मिळाली पण त्यानंतर मुंबईबाहेर पडावे लागले. आणि तसंही डोंबिवली म्हणजे काय खरी मुंबई नव्हे हे आता कळले आहे. :P 
आता पुन्हा मुंबईत यायचा chance मिळाला. मुंबईत यायचे ठरले, तेव्हा मी बंगलोरला होते. तिथल्या मराठी मित्र मंडळातून जे मुंबईचे होते त्यांना मी सहज मुंबईबद्दल 'review' विचारायचे. बहुतांशी लोक मुंबईचं कोडकौतुक करत. नाही म्हटलं तरी मुंबई न आवडणारेही १-२ लोक सापडले. अशा या मुंबईचा गाजावाजा मी जरा जास्तच ऐकत आल्यामुळे तशी मी ह्या शहराबद्दल उत्सुक होते.   
मुंबईत पाऊल ठेवताक्षणी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे हवेतला तीव्र दमटपणा. त्याच क्षणी वाटलं, बोंबला! आपलं इथे कसं होणार देव जाणे. कारण पहिल्यापासूनच माझं आणि घामाचं वाकडं आहे. आणि इथे तर क्षणोक्षणी घामाची अंघोळ घडत असते. त्याची सुद्धा सवय होते असं मुंबईतल्या नातेवाईक आणि मित्र मंडळींकडून  ऐकून ऐकून मी थोडंफार मानसिक समाधान प्राप्त केले होतं. तर मुंबईत हळूहळू मी रुळायला  लागले. लिंकिंग रोड आणि SV Road च्या मध्ये साधारण मी रहायला आहे .. तर आजूबाजूचा भाग explore करायला मी  सुरुवात केली आणि नंतर लोकल भटकंती. सुरुवातीला १-२ दा कोणाबरोबर तरी लोकल ने प्रवास केला. मग एकटीनेच जायला सुरुवात केली. तेव्हा कोणत्या बाजूला कोणती ट्रेन येते, digital board कसा वाचायचा, आपण नक्की योग्य ट्रेन मध्ये शिरलोय ना, नाहीतर चर्चगेट ला जायचेय आणि पकडली बोरीवली ट्रेन असली भानगड व्हायला नको. पण मुंबईने सगळं खूप पटापट शिकवलं. मुंबईत कोणीही कोणाला बिनधास्त शंका विचारतात; अर्थात मुंबईप्रवासाविषयी. कोणाला  उगाच लाज किंवा संकोच वाटत नाही. उदा. ही fast लोकल आहे ना, ही बेलापूर लोकल ठाण्याला थांबते ना,  पुढची विरार लोकल कधी आहे.. आज ट्रेन्स लेट आहेत का, ही ट्रेन बांद्रा आहे की बोरीवली (कारण बांद्रा चा shortform B आहे आणि बोरिवलीचा Bo. तर confusion झाल्यास) इ.   आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक मनमोकळेपणाने सांगतात सुद्धा. 'मला नाही माहीत' किंवा 'वाचता येत नाही का' असल्या खवचट टिपण्या करत नाहीत.  
मुंबई खूप मोठी असली तर एक मात्र आहे, मुंबई ची रचना कळणं अवघड नाहीये तसं. शेवटी एका बेटावर वसली आहे ही मुंबई. आकार वाढू शकतच नाही. वाढताहेत ती फक्त लोकं. :) मुंबई ही चर्चगेट  ते विरार अशी खालून वर पसरली आहे. एकानंतर एक सरळ रेषेत सगळी  स्टेशन्स अहं sorry suburbs पसरली आहेत. दादर, बांद्रा, गोरेगाव, बोरीवली यांना मी आपली स्टेशन्स म्हणायचे साध्या भाषेत. पण नाही हो, मुंबईकर त्यांना suburbs म्हणतात :) अशी ही सगळी suburbs  मिळून मुंबई तयार होते. प्रत्येक suburb चं स्वत:चं असं वैशिष्ट्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ, पार्ले म्हणजे  खास मराठी (आणि गुज्जू) लोकांची वस्ती. बरेचसे साहित्यिक, कलाकार पार्ल्याचे! मुंबईतलं पुणं असंही म्हणतात पार्ल्याला. इथेच  आपल्या आवडीच्या प्रसिद्ध पार्ले बिस्किटांची factory आहे; म्हणूनच नाव विलेपार्ले. दादर - सर्व दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण. south bombay ला स्वत:ची  अशी एक वेगळीच ओळख आहे. असं प्रत्येक भागाला आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व आहे. मुंबईची गर्दी, अस्वच्छता हे कुप्रसिद्ध मुद्दे असले तरी मुंबईत काही भाग खरंच उत्कृष्ट, स्वच्छ, posh आणि मुख्य म्हणजे शांत आहेत.  मस्त वाटतं भटकायला. 

   एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ ही उक्ती मुंबईकर अगदी सार्थ ठरवतात. आता इथे मुंबईकर म्हणजे फक्त मुंबईचे असलेलेच नव्हे तर मुंबईत तूर्तास राहणारे सगळे अपेक्षित आहेत. म्हणजे मग त्यात सगळ्या प्रांतातले, कायमस्वरूपी इथे असणारे, तात्पुरते आलेले सगळे सगळे आले. आणि त्यात चक्क रिक्षावाले ही जमात पण आली. पुणे, बंगलोर इथले रिक्षावाले पाहिल्यावर मुंबईचे रिक्षावाले बरेच बरे आहेत. रात्री अपरात्री ही कुठेही येण्यास फारशी कुरकुर न करणे, कितीही जवळच्या भागात यायला चटकन तयार होणे, उरलेले सुट्टे पैसे passenger मागण्याची वाट न  बघता चोख परत करणे या कामगि-यांमध्येच त्यांचं यश आहे. आता माझा हा परिच्छेद वाचून कोणीतरी 'असला काही अनुभव मला आला नाही' वगैरे म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आंब्यांच्या आख्ख्या पेटीत एखादा आंबा सडका निघणारच. त्याला पर्याय नाही. 

तर अश्या या शहरात पक्के मुंबईकर आणि बाहेरचे लोक मुंबईच्या गर्दी, उकाडा अशा रोजच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ठाण मारून का आहेत, याचं गमक मला हळूहळू का होईना कळायला लागलंय. हो, मुंबईत गर्दी आणि उकाडा या २ मुद्द्यांना समस्याच म्हणावं लागेल. आणि जो पर्यंत तुम्ही या २ मुद्द्यांना निव्वळ सतत घडणा-या साध्या घटना किंवा Part of routine न समजता 'समस्या' समजता तो पर्यंत तुम्ही पक्के मुंबईकर नव्हे हेही तितकंच खरंय!  ;)    


- अदिती 


Friday, August 26, 2011

इच्छा तेथे मार्ग!

               परवा माझ्या मामीशी सहज गप्पा चालू होत्या. मामी म्हणजे सदैव active ! आणि मामा गेल्या नंतर अमेरिका सोडून ती भारतात-पुण्यात आली आणि तिने स्व:ताला भरपूर activities मध्ये गुंतवून घेतलं. कोणालाही हेवा वाटावा असं तिचं रोजचं timetable  होतं. शाळेत शिकवणे, hobby  classes मध्ये शिकवणे, पेटी शिकणे अन वाजवणे,  हर त-हेच्या ग्रुप मध्ये सहभागी  होणे जसे - पत्ते-ब्रिज, भिशी, पुस्तक भिशी, ग्रुपसहल इ.  आजकाल वेळ जात नाही असं म्हणणा-यांना मामीचं उदाहरण  हमखास देता येईल. तर परवा ती बोलता बोलता म्हणाली, अगं आमच्या ग्रुप ची  मी आता प्रेसिडेंट झालेय सो कामं वाढणार. मला खूप आनंद झाला. पण प्रश्नचिन्ह होतंच की हा नक्की कोणता ग्रुप कारण तिचा असंख्य ग्रुप्स मध्ये सहभाग होता. कोणता ग्रुप विचारल्यावर ती म्हणाली, हा आहे आमचा 'singles चा ग्रुप'. नावावरून तशी कल्पना येत होती, पण तरी खोलात विचारल्यावर ती म्हणाली, या ना त्या प्रकारे single असलेले किंवा झालेले कोणत्याही वयोगटातले स्त्री-पुरुष या ग्रुप चे मेम्बर होऊ शकतात. म्हणजे त्यात divorcees आले, विधवा, विधुर आले, किंवा लग्नाचा पर्याय न स्वीकारलेले सुद्धा! हे सगळे दर रविवारी भेटतात आणि काही ना काही कार्यक्रम करतात. कधी वेगवेगळी चर्चा सत्र तर कधी dinner  programs! कधी picnics तर  कधी celebrities ना बोलावून त्यांचा मुलाखत कार्यक्रम! त्यात भरीस भर म्हणजे, ज्यांना (पुन्हा) लग्न करायची इच्छा आहे अश्या मेम्बर्स चे वेगळे ग्रुप करून त्यांचे त्या दृष्टीने पण एकत्र कार्यक्रम होतात जेणे करून त्यांना आपला साथीदार सापडावा. 

मला ऐकूनच इतका हुरूप आला. काय मस्त संकल्पना आहे. आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे व्यथित होऊन उगाच आयुष्य पुढे 'रेटत' बसायचं की या अश्या नवीन संकल्पनांचा स्वीकार करून आयुष्याचं खरंच सोनं करायचं हे आता सर्वस्वी आपल्या हातात आहे. पूर्वी नव्हतं असं culture आपल्याकडे. पण  आता मात्र आपल्याकडे असे मार्ग आहेत हे पाहून खरंच आनंद झाला.

कोणीतरी मध्ये facebook wall वर लिहिलं होतं. 'Only you are the incharge of your happiness'. या वाक्याची खरी प्रचीती मामीकडून या  ग्रुप बद्दल कळल्यावर  आली. की खरंच तुम्हीच तुमच्या आनंदासाठी जबाबदार आहात आणि त्यात अश्या ग्रुपचे  माध्यम उपलब्ध असेल तर खरंच इच्छा तेथे मार्ग!

-अदिती


Thursday, August 11, 2011

आठवण.. नव्हे साठवण !

पुन्हा गणपती, पुन्हा practice,
पुन्हा जागरणं, पुन्हा सुखसागरची पावभाजी,
पुन्हा गुजराथी मेसचं जेवण, पुन्हा रात्री २ ला बंगलोर भटकंती !
पुन्हा तीच ओढ, तीच नशा... तीच धम्माल..
पण.. एक नवीन आठवण.. नव्हे साठवण !

Missing all those lovely moments.. I hope I live those again..

माझ्या सगळ्या बंगलोरस्थित मित्रमंडळाला अनंत शुभेच्छा !!

- - अदिती

Thursday, July 28, 2011

Optimum utilization of available resources !


> Reached office at Airoli and realized, have forgotten my I-card at a relative's place in Thane, that too near Ghodbandar road at वाघबीळ  नाका.
12.22pm

> वाघबीळ  नाका to Thane station 45 min by bus and then Thane-Airoli 20 min by train.

> Had no patience to take the same boring route back to collect my I-card.  

> Going to Thane tomorrow from Khar(my home) to collect the I-card, would be again the same story of wasting time, energy and money(though negligible).

> Spoke to our Transport team to find out, if someone is coming from वाघबीळ  नाका in the next couple of hours. Answer I received : YES.
12.27pm

> Got the driver's and cab-members' numbers. Contacted one cab-member whose pick up was after वाघबीळ.
12.32pm

> So spoke to driver, explained him the story, requested him, if he can wait at Vaghbil naka, where my uncle will reach with the माननीय, आदरणीय guest of honour 'my I-card' :P for which the whole story is being created :D. Got another YES from him.
12.35pm
                                                                     
> Spoke to uncle, if he can do the needful :). So sweet of him to grant me another YES.
12.37pm

> Again a couple of calls for better co-ordination : Uncle.. the car is so n so.. number is so n so.. etc etc.. Driver.. my uncle will stand at वाघबीळ  नाका, wait there for a couple of mins bla bla bla..
12.47pm

> And while the conversation is going on, both meet each other and the hand-over of I-card gets executed and finally its(I-card's) journey towards my way commences.
12.48pm

> Whole story of mere 20mins :) And while I write this sentence, I receive the I-card as direct home delivery, rather desk delivery :P by one of the cab-members who is in my team :)
2.05pm

Isn't it really the optimum utilization of available resources? A live example of fruitful outcome by means of unconditional support :P

But still the baseline is, one shouldn't forget their belongings anywhere :D


- Aditi



Tuesday, July 19, 2011

De da na dan ..

                          I hadn't thought off in my life ever that someday I would be writing 'the description of my birthday'. :P But yeah, m doing it. So here it goes: For me, it was the most memorable birthday of lifetime. Honestly speaking, neither am I excited about my birthdays, nor do I like accepting gifts. But this time, it was full of just a series of surprises right from 12 am till 10 pm! 

Ideally speaking, surprises started from 11th July '11 only, when I received a courier from a very dear friend of mine. And then one more on 14th and another on 15th :) And one from a couple of friends pretty early in June only, since they were here in Mumbai.  

Since I have been into different friend groups, we have celebrated birthdays in various styles. But as I was going to celebrate this birthday of mine with family after many years, I was happy about it. I came back on 14th night from office and went to bed as usual. At sharp 12am, my mother-in-law, father-in-law, maushi entered my room literally singing the song 'Happy birthday to you'. Rutu was fast asleep :P as expected, but to my surprise, the cake was brought by him only :). So that was my first surprise. Then, at 7.10 am in the morning, Rutu handed over a box to me with the dialogue 'Happy birthday'. Couldn't understand what it is. When removed plastic, could read 'blackberry' on the box.. And yeah it was a brand new lovely purple blackberry in my hand. :). I was freezed for a couple of minutes. Hadn't thought of such thing in wildest of my dreams. :P This was surprise no. 2. Went to office and unexpectedly my colleagues had a fantastic plan for me. They had got lovely yellow, red Gerberas for me, a very nice greeting card and a beautiful Ganpati wall-hanging and guess what a Pizza party for lunch. Surprise no. 3. Phone calls of friends from various bunch of folks were accompanying me throughout the day. Left for the day early at 4pm and reached home at about 5.20pm. Poonam and her mom were there and got the 4th surprise.

Got into my room and wowww.. the room was beautifully decorated with a big greeting card made by Aai and some of my photos. 5th Surprise. Bell rang after some time, and it was my brother Chirantan!!! The 6th surprise. I was simply shocked and didn't understand how to react. Moreover, it was Chiru's own plan to surprise me. No one suggested him. He got a lovely stole especially for me from Ladakh. Then Himangi arrived, who had informed me in the morning that she is coming :) My friends Bakul and Jayada were the next guests of the surprise party, who were definitely kind of expected. So that wasn't really a surprise, but they got a lovely flower bouque, cake and some nice gifts.. The menu was Pav bhaji, Poonam's speciality and some sweets. Then we had the delicious food. And then last but not the least, my cousin sister Mithila arrived at about 10 to gimme a surprise.. So sweet of her to take pain coming all the way from Powai and to keep the same smile consistent even after the frustrating 2.5 hours in traffic jam ! The 7th surprise ! And then a lovely cake with a 3D German dictionary on the top of the cake was brought in the hall. The idea was just awesome and added to the number of surprises :P Surprise no. 8.

Thus, it was a wonderful, amazing, fantabulous day filled with a series of de da na dan pleasant surprises throughout the day!

Essay completed :P

- Aditi
  15-July-2011

Tuesday, May 31, 2011

मॉल मध्ये खरेदी ? नको रे बाबा !

सध्या बिग बजार, स्टार बजार, ब्रॅंड फ़ॅक्टरी या असल्या शॉपिंग मॉल्स ला अगदी ऊत आलंय ! ब्रॅंड फ़ॅक्टरी म्हणजे सगळ्या ब्रॅंड्स चे कपडे एकाच छताखाली उपलब्ध !
परवाच तिथे जाण्याचा योग आला. आला म्हणजे आणला.. Urgently जीन्स घ्यायच्या होत्या मला २. एका मित्राशी बोलताना लक्षात आलं की shopping MG road किंवा Brigade road ला जायच्या ऐवजी ब्रॅंड फ़ॅक्टरी ला जावं जिथे म्हणे सेल चालु आहे. म्हटलं बघू तरी सगळ्या ब्रॅंड्स चे कपडे एकाच वेळी. म्हणुन मी आणि माझे २ मित्र निघालो. होती ती शनिवार संध्याकाळ !
सगळ्या रिकामटेकड्या लोकांची झुंबड त्या मॉल मधे !

पुर्वी रिकामटेकडे लोक , म्हणजे रविवारी रिकामटेकडे असलेले लोक संध्याकाळी बागेत जायचे. जत्रेला जायचे. आता लोक मॉल मधे जातात ! तर त्या जत्रेत आपलं sorry त्या मॉल मधे शिरल्या शिरल्या इथे कमालीचा गोंधळ असणार अशी कल्पना येऊन गेली. Levi's ची जीन्स शोधता शोधता नुसते नाकी नऊ आले आणि मघाशी नुसती येऊन गेलेली कल्पना खात्रीत बदलली.  
शेवटी available असलेल्या brands मधून २ जीन्स final केल्या; म्हटलं trial तरी घेऊन येऊ. Trial rooms च्य बाहेर आता वेगळाच गोंधळ ! हातात कपड्यांचे बोचके च्या बोचके घेऊन लोकं रांग लावून उभे ! ! मी कपाळाला हात लावला.. रांगेत उभं राहण्याशिवाय मला पर्यायच नव्हता. आत गेलेल्या मुली, बायका कित्ती वेळ झाला तरी बाहेर यायला तयार नव्हत्या ! सार्वजनिक स्वच्छता गृह किंवा अगदी multiplex च्या rest room मधेही वेळ लागणार नाही इतका वेळ ह्या बायका फ़क्त कपड्यांची trial घ्यायला  लावत होत्या ! ! आता एवढ्या मेहनतीने कपडे select केले होते म्हणून म्हटलं जाऊ दे अजून ५मि. आणि एकदाचा माझा नंबर आला ! कपडे final केल्या नंतर ते घेऊन कधी तिथून बाहेर पडतोय असं झालं होतं. तोच विचार करत मी पैसे भरण्याच्या counter  वर  
गेले आणि आज माझा अंत पाहण्यात येणार आहे ह्याची लगेच जाणीव झाली. सगळ्या counters वर भल्या मोठ्या रांगा होत्या. आता एवढ्या मेहनतीने कपडे select करून final केले होते म्हणून म्हटलं जाऊ दे अजून १५मि. आणि माझा नंबर आला असं वाटलेलं असतानाच counter वरच्या पोराला साक्षात्कार झाला की कार्ड machine गंडलेलं आहे! आणि आज काल 'cash carry'  करण्यापेक्षा  'कार्ड  carry ' करणे अधिक सोयीचे झाले असल्यामुळे  आणि त्याही पेक्षा डोळ्या देखत पैश्यांच्या नोटा दुस-याच्या  हवाली करताना वाटणारी हळहळ  नाहीशी करण्याचे सामर्थ्य त्या कार्ड मध्ये असल्यामुळे कार्ड जरा जास्तच सोयीचे वाटते. आणि म्हणूनच  'cash  payment ' करण्याचा पर्याय त्या दिवशी माझ्याकडे उपलब्ध नव्हता ! एक क्षण वाटलं गेले खड्यात ते कपडे... जावं इथून. पण आता एवढ्या मेहनतीने कपडे select करून final करून रांगेत १५मि. उभे राहिल्यावर म्हटलं जाऊ दे अजून १०मि. आणि माझा नंबर त्यांनी दुस-या counter  वर shift  केला.  बोंबला. आता तिथे असलेले लोक आमच्यावर किंवा counter staff  वर भसकन खेकसून नवीन तंटा सुरु करणार या विचारानेच धडकी भरली आणि या वेळी मात्र आपण पण आरडा ओरडा करायचा असा मनाशी ठरवत असतानाच तिथला manager सारखा कोणीतरी आला आणि आमच्या रांगेतल्या लोकांना त्यांनी उर्वरित रांगांमध्ये सारख्या प्रमाणात 'divide' केलं. हुश्य! आता पुन्हा वाट पाहणे मोहीम सुरु ! १७मि. शांत चित्ताने रांगेत उभं राहिल्या नंतर एकदाचा माझा नंबर आला. इथे counter वर एक मुलगी होती. मुलगी कसली कुपोषित बालिका असावी असं पाप्याचं पितर होतं ते. आणि आपल्या बुद्धी, शक्ती, युक्ती क्षमते प्रमाणे निवांतपणे आपल्या सवडीने प्रत्येक price tag bar  code reader समोर धरत  तिने बिल तयार केले मी कार्ड हातात घेऊनच उभी होते(उघड आहे). कार्ड swipe करणे, password टाकणे मग पुन्हा ते बिलाचं छोटं चिटोरं येईपर्यंत वाट बघून मग त्यावर सही करणं या अत्यंत कंटाळवाण्या  आणि बिनडोक कार्यक्रमानंतर मग कपड्यांच्या घड्या घालून पिशवीत ठेवून ती पिशवी माझ्याकडे सुपूर्त करताना ती मुलगी म्हणाली 'Have a nice day ahead ma'am !" त्यावेळी भो.. , भ.. अश्या असंख्य शिव्या जिभेवर असूनही अजून एक क्षणही तिथे थांबायची इच्छा नसल्यामुळे एका धीराच्या, सोशिक ग्राहकाप्रमाणे मंद स्मितहास्य करून Thank you म्हणून मी बाहेर पडले.

अश्याच अनेक कथा बिग बजार, स्टार बजार येथे रोज घडत असतात. या मॉल  वाल्यांना एकच विनंती आहे. भरपूर varieties  देता, एवढ्या भरगच्च offers देता, discounts देता.. पण तुमच्यासाठीच महत्वाच्या असलेल्या बिलाच्या counters वर एवढे दुर्लक्ष! एकदा स्वत:च त्या रांगेत उभे राहून बघा.  मला काय म्हणायचेय ते कळेल आणि वळेल ही.

- अदिती.

Friday, February 18, 2011

उन्हाळ्याची दुपार


उन्हाळ्याची दुपार म्हटली की मला आठवते ती शाळेत असतानाची उन्हाळ्याच्या सुट्टीतली दुपार !
निरव शांततेत पंख्याच्या आणि कुलरच्या संमिश्र आवाजात घालवलेली दुपार;
फ़्रिज मधे ठेवलेल्या साच्यांमधल्या दुधाच्या कुल्फ़्या आणि लांबट पिशव्यांमधे ठेवलेल्या रंगीत पाण्याचा बर्फ़ाळ पेप्सीकोला कधी होणार याची वाट बघत आणि १० वेळा फ़्रिज उघडुन बघत घालवलेली दुपार;
आवडता सिनेमा बघत एकीकडे आमरसासाठी आईला आंबे पिळुन देताना घालवलेली दुपार;
आईने केलेल्या ताज्या ताज्या ताकातला लोण्याचा गोळा खायला मिळण्यासाठी स्वैपाकघरात लुडबुड करत काढलेली दुपार ;
आता पुन्हा मला २०११ चा तसाच उन्हाळा खुणावतोय ; पण तशी दुपार किंबहुना तश्या ’दुपारी’ मिळणं मात्र :)

Tuesday, January 4, 2011

मुंबईच्या पार्ल्यात आल्याची पावती !

बॅंगलोर सारख्या कानडी प्रांतातून नुकतीच मी मुंबईला आले कायमची आणि आल्या आल्या पाय मुरगळल्यामुळे डॉक्टरांनी minimum walking ठेवा अशी सुचना केली. आधीच मुंबई नवीन असल्यामुळे कधी इकडे तिकडे भटकायला जाते असं मला झालं होतं आणि त्यातच ही सुवार्ता कळली. म्हणुन फ़क्त निकडीच्या कामांसाठीच मी बाहेर पडत होते. एका महत्वाच्या आणि urgent shopping ची जबाबदारी माझ्यावर आणि माझी मुंबईतली unofficial guide पूनम आमच्यावर येऊन पडली होती, त्या निमित्ताने आम्ही दोघी पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहा जवळ च्या मार्केट मधे खरेदीला गेलो होतो. मी लहानपणापासुन पार्ला या ठिकाणाबद्दल ऐकत आले आहे, आई बाबांकडुन, मित्र मंडळींकडून, की पार्ला म्हणजे मुंबईतलं पुणं !  त्या मुळे उगाचच जरा उत्सुकता होती. थोडी फ़ार खरेदी झाल्यावर महत्वाच्या कामाची आठवण झाली. पेटपूजा .. !! :) तिथे मार्केट मध्येच असलेल्या चविष्ट पदार्थ मिळणा-या फ़ास्ट फ़ूड सेंटर मधे आम्ही जाऊन धडकलो आणि डोसा, पाव भाजी इ. ऑर्डर केले. मुंबई म्हणजे १२ पैकी १० महिने उकाडा, घाम ! त्यामुळे ९०% restaurants मधे AC असते हे सांगणे नव्हेच. आत्ता पर्यंत मला note करण्याएवढं  विशेष असं काहीच आढळलं नव्हतं आणि of course मी काही असं मुद्दाम शोधत पण नव्हते. ऑर्डरची वाट बघत जरा २मि. शांत बसलो होतो आम्ही... वरती speakers मधुन instrumental music चा मंद, मधुर ध्वनी कानी पडत होता. नीट लक्ष देऊन ऐकले तर ’चांदणे शिंपीत जाशी’ या गीताची धुन होती.. मला अतिशय आश्चर्य वाटले.. मग पुढचं गाणं होतं ’तोच चंद्रमा नभात’ , त्या नंतर ’लव लव करी पातं ’, मग ’आला आला वारा’ ...  प्रत्येक गीतानिशी मी चकीत आणि आनंदी होत होते...
अवघ्या मराठी संगीत विश्वातली एकूण एक अजरामर अशी गीते पेश होत होती !!
आधीच मी मागची २ वर्षे बॅंगलोर मधे असल्याने मराठी गाणी सार्वजनिक ठिकाणी ऐकायला मिळणे ही एक अशक्य घटना होती.. आणि आता तर महाराष्ट्रात पण सार्वजनिक ठिकाणी मराठी गाणी हा योग दुर्मिळच ! आणि त्यात असं मराठी गीतांचं pure instrumental music ऐकायला मिळणं म्हणजे पर्वणीच नाही का !!


पार्ल्याला मुंबई़चं पुणं का म्हणतात याची खात्रीची पावती मला मिळाली !




-अदिती 

Friday, April 2, 2010

         कुर्ग ला न्यायला विसरलेल्या फ़रसाणाची विल्हेवाट, म्हणजे चांगल्या रितीने विल्हेवाट लावण्यासाठी :) arrange केलेल्या मिसळ पार्टी मधे राजे उर्फ़ गौरव ने पौर्णिमेच्या रात्री स्कंदगिरीच्या night trek ची कल्पना मांडली. स्कंदगिरीच्या night trek बद्दल आम्ही जवळ जवळ वर्षभर ऐकत होतो. म्हणजे चांगलं ऐकत होतो. :) आधीच night trek त्यामुळे आम्ही excited होतो त्यात पुनवेच्या राती वगैरे..म्हणजे अगदी दुधात साखर किंवा सोनेपे सुहागा.. situation ला साजेसं म्हणायचं तर ट्रेकात चांदणं :) असं झालं आणि भरीत भर म्हणजे ती रात्र शनिवार रात्र होती.  म्हणजे अगदी साखरेच्या दुधात केशर किंवा आता बॅंगलोर मधे आहोत म्हणुन साखरेच्या दुधात बादाम पूड अशी situation झाली ! :) त्यामुळे १-२ लोक वगळता सगळे अगदी एका पायावर तयार !

२-३ दिवस उलटताच एका मित्राने त्याच्याकडे संग्रहीत असलेले स्कंदगिरीचे काही फोटो शेअर केले.. फोटो इतके अप्रतिम होते, की एक क्षण वाटून गेलं की ही कोण्या फोटो एडिटर ची तर कमाल नाही ? इकडचे ढग, तिकडचं आकाश आणि पलिकडचे डोंगर एकत्र करून सुंदर फोटो create करून खपवणारे भामटे आजकाल पुष्कळ असतात. पण नाही, त्या मित्राने, विवेकने सांगितले की अगं ते फोटो खरे आहेत. मित्राच्या कॅमेरातले. एडिटेड नाहीयेत. मग मात्र आमची उत्सुकता शिगेला पोचायला वेळ लागला नाही आणि ट्रेक ला अजुन २ आठवडे शिल्लक होते ! !

हळुहळु एकदाचा तो दिवस येऊन ठेपला. प्रत्येकासाठी ब्रेड बटर, ब्रेड जॅम, १ बिस्किट पॅकेट, २ चॉकलेट बार असं पॅकेज तयार केलं होतं. त्याचं वाटप करून एकदाचे आम्ही निघालो 7 bikes, 1 car अशी फ़ौज घेऊन. काही पुढे, काही मागे असं करत एका फ़ाट्याला येऊन पोचलो जिथे डावीकडे वळून स्कंदगिरीचा रस्ता जातो. तिथे वळलो खरं पण तिथुन पुढे मिट्ट काळोख ! आणि त्यात आला मधे एक त्रौक. म्हणजे तीन रस्त्यांचं जंक्शन. इथुन वळायचं कुठे ! तिथे एकमेव कन्नड पाटी होती. आता आमच्यातल्या एका मित्राला अभिजितला अस्खलित कन्नडा बोलता येत होतं पण वाचता येत नव्हतं. म्हणजे कन्नडा वाचता येत नव्हतं :) त्या मुळे झाले वांदे. सर्वात पुढे असलेल्या कारने डावीकडे गाडी वळवली खरी पण थोडं पुढे आल्यावर २-३ जणांना शंका आली आणि रस्त्यातच थांबलो. आता पुढे जायचं की मागे काही कळेना. एक क्षण वाटलं आता ट्रेकही इथेच, सुर्योदयही इथेच. :D. मग २ जण परत मागे आले आणि त्या junction ला पोचून तिथे कोणाला तरी विचारु म्हणुन तिथे येऊन थांबले. तिथेही काळं कुत्रं नव्हतं चौकशी करायला. मग काही वेळात एक टेंपो आला. त्याच्याकडुन रस्ता कळला.. आम्ही रस्ता चुकलोच होतो. उरलेले सगळे मग आल्या पावली मागे फ़िरले आणि परत सगळे junction ला पोचले. आणि मग आम्ही योग्य(?) वाट धरली. टेंपोवाला पुढे आणि आम्ही मागे अशी आमची फ़ौज. ५ मि. आम्ही आपले टेंपोला follow करतोय. मग प्रत्येकाचे कल्पक तर्क सुरू. ’अरे, टेंपोवाला आपल्याला kidnap तर करत नाहीये’, ’टेंपोवाल्याने आपल्याला एका निर्जन ठिकाणी (अजुन काय आता डोंबल निर्जन !) नेऊन आपल्याकडच्या सामानावर दरोडा टाकला तर’.. अजुन निरनिराळे तर्कवितर्क येण्या आधीच स्कंदगिरीचा पायथा आला.. हुश्य !

तिथे पार्कींग, urgent calls :), Guide hire करणे इ. time pass गोष्टी उरकल्यावर आमचा ट्रेक सुरू झाला. एव्हाना २ वाजून गेले होते. १९ जण ३ ग्रुप मधे आपोआप divide झाले. गाईड obviously सर्वात पुढे होता. आमच्यातल्या एका मैत्रिणीला अस्थमाचा त्रास असल्यामुळे आमची ६-७ जणांची सर्वात शेवटची बॅच निवांत चढत होती. अरुंद, रुंद, सोप्प्या, अवघड, खडकाळ, सपाट अशा विविध वाटांमधून टॉर्च च्या  मदतीने (नाही, पौर्णिमेची रात्र असल्यामुळे चांदण्याचा प्रकाश पुरेसा असेल असं तुम्हाला वाटत असेल पण तसं काही नव्हतं. निदान आमच्या सारख्या नवोदितांना तरी नव्हतं. ) वाट काढत एकदाचे आम्ही त्या शिखरावर पोचलो. ४.३० वाजुन गेले होते. काही आधीच पोचलेली मंडळी आमची वाट पहात थांबली होती. पोचताच जाणवला तो वेड्यासारखा गार वारा तोही बोचणारा ! त्यामुळे गाईड ने सुचवलेल्या(त्याच्या लाकुड विकणा-या मित्रांचा business नको का व्हायला! ) शेकोटीची कल्पना हो-नाही करत(कारण काही वेळात सुर्योदय होईल असं वाटलं) संपन्न करण्याचं ठरवलं.  पुनवेची रात्र / पहाट अन त्यात शनिवार वगैरे (पहिला परिच्छेद वाचणे) असल्यामुळे जिकडे तिकडे corner corner ला नुसता लोकांचा सुकाळ. शेवटी विवेक ने एक झकास corner cum उंचवटा शोधून काढला. तिथे आम्ही आमचा काही तासांचा मुक्कम ठोकला.

शेकोटी पेटल्यावर जराशी मिळालेली ऊब सुद्धा वाळवंटात मिळालेल्या पाण्याच्या २ घोटांएवढी मोलाची होती. कदाचित वाटेल , जरा अतीच लिहिलंय. जर इथेच ही परिस्थिती असेल तर तिकडे वरती काय हाल होतील, सिमला, मनाली ला.. खरंय..पण त्या वेळी खरंच वाईट्ट वारं होतं.
तिथेच सगळ्यांकडे आपापलं breakfast parcel मी सुपुर्त केलं, सगळ्यांनी ते मटामटा खात संपवलं.

शेकोटी असल्यामुळे मग गाण्यांचा मूड बनला आणि आठवतील तशी

उडे जब जब जुल्फ़े तेरी
हमे तो लुट लिया मिलके हुस्न वालो ने
चम चम करता
तेरा होने लगा हू (हे शेकोटीला शोभत नाही, पण तरी )

वगैरे गाणी म्हणायला सुरूवात झाली.
मग निखिल ने काही शेकोटी स्पेशल गाणी म्हटली..

काही वेळात मग सगळ्यांना सुर्योदयाचे आणि काही जणांना निद्रापुर्तीचे वेद लागले.. :)
हळुहळु आम्ही सगळे पुर्वेला असलेल्या एका उंचवट्यावर येऊन थांबलो.  वारा सुसाट वाहात होता !
हळु हळु वाट लागत चालली होती ! १०-१५ मि. उलटली तरी सुर्यदेव काही येईना. आता ये बाबा एकदाचा असं वाटायला लागलं ! त्या बोच-या वा-याची आठवण पण नकोशी वाटते ! आणि अजुन १० मि. गेल्यावर थोडंसं उजाडायला लागलं. काळं आकाश हळुहळू निळसर रंगाने व्यापून गेलं.

त्या नंतरही नेहमीचा आपला सुर्योदय होईल असंच एक feeling होतं, निदान माझ्या मनात तरी.  मग केशरी रंग दिसू लागला.. आता मात्र सुर्योदयाचे वेद लागायला लागले. मग हळुहळू त्या तेजाच्या केशरीबुंद गोळ्याचं ऐटीत आगमन सुरू झालं. जिकडे तिकडे कॅमेराज अन फोटोग्राफ़र ! काही क्षणातच सुर्याचा पुर्ण गोळा आपल्या स्थानावर विराजमान झाला.. अन काय सांगावं. अचानक लक्ष गेलं तर ढगांचे पुंजके च्या पुंजके गोळा झाले होते... दरीतून खाली दिसणारं गाव, गावातली घरं, शेती हे सगळं धुसर होत चाललं होतं. आणि समोर नजर टाकली तर सगळे ढग ग्रुप करून पिकनिक ला निघाले आहेत की काय असं वाटत होतं.. क्षणा क्षणाला ढगांची संख्या वाढतच होती.. आता दरीतून खाली दिसणारं गाव पुर्ण पणे झाकलं गेलं होतं. डावीकडुन उजवीकडे अशी १८० डिग्री मधे मी माझी मान वळवली आणि जे समोर होतं त्याने माझे डोळे अक्षरश: दिपून गेले..
जिकडे तिकडे नुसते ढगच ढग. आता तुम्ही म्हणाल हिचं ढग पुराण कधी संपणार !   पण खरंच ते दृश्य कदापि विसरणं शक्य नाही.  आपण Hill Station वर जे Sunsets, Sunrises बघतो, तिथेही नक्कीच ढग असतात, पण ते विरळ असतात.. प्रत्येक पुंजका मोजता येईल असे असतात. पण इथे म्हणजे ढगांचा मोठ्ठा गालिचाच तयार होता, नव्हे.. ढगांचं मऊ, गुबगुबीत अशी गोधडीच तयार झाली होती.
एखाद्या चांगल्या चित्रकाराने काढलेल्या चित्रात असं नक्कीच बघायला मिळेल किंवा एखाद्या animated movie मधे ! पण प्रत्यक्ष बघताना काय वाटत होतं, हे शब्दातीत आहे !
असं वाटत होतं की आजुबाजुचं सगळं काही डोळ्यात भरून घ्यावं .. अगदी भरभरूऊऊऊऊन ! असं मला या आधी कुठलाही सुर्योदय, सुर्यास्त किंवा अजुन कुठलाही डोंगर, दरी पाहून वाटलं नव्हतं .. ढगांचे नुसते थरावर थर आणि मध्यभागी तप्त सुर्याचा केशरी गोळा, करावं तितकं वर्णन कमी आहे ह्या दृश्याचं ! ! कित्तीतरी वेळ मी कॅमेरा, फोटो हे सगळं विसरून गेले होते.. कोण कुठे आहे याचंही भान मला नव्हतं.. मला फ़क्त ते सुंदर दृश्य एक कायमची आठवण म्हणुन डोळ्यात टिपून घ्यायचं होतं !

थोडंफ़ार फोटो सेशन झाल्यानंतर परत खादाडीचा मूड बनला. तिथे असलेल्या टपरीतून गरम गरम पाणीदार मॅगी, बेचव ऑमलेट यांची चव घेताक्षणी आमची हौस फ़िटली ! :D मग हळुहळू उतरायला सुरूवात केली. उतरतानाही आमची बॅच शेवटची ठरली. निवांत, रमत गमत, अधुन मधून फोटो सेशन करत आम्ही उतरलो. 

नंतर अनेक दिवस असंच मनात येत राहीलं, कोणास ठाऊक त्या पहाटे कुठे होतो आम्ही .. ! !

Tuesday, February 2, 2010

स्कंदगिरीचा सुर्योदय - एक संस्मरणीय अनुभूती !

कोणास ठाऊक कालच्या पहाटे  कुठे होतो आम्ही ..  कुठे गेलो होतो आम्ही हे देखील माहीत नाही असं वाटुन अचंबित झालात!?. पौर्णिमेच्या रात्री खडक, दगड धोंडे, अरुंद पाय वाट या सगळ्यातून आम्ही ट्रेक करत स्कंदगिरी नावाच्या टोकावर पोचलो होतो खरी, पण झोंबणारं गार वारं, आजुबाजुला पहावं तिथे पांढ-या शुभ्र ढगांच्या झालरी की ढगांच्या लाटाच त्या की डोंगर द-यांना मिळालेलं  ढगांचं गुबगुबीत पांघरुण ! आणि त्या ढगांच्या पल्याड उगवणारा तो तप्त केशरीबुंद तेजाचा गोळा की जणु दरबारात राजमार्गाने ऎटीत आगमन करणारा राजा, हे असं दृश्य पाहून नंतर पुन्हा पुन्हा हेच वाटत राहीलं ..
ते ठिकाण स्कंदगिरी होतं की स्वप्ननगरी, की निसर्गाच्या अमाप, अद्वीत सौंदर्याचं दर्शन घडवणारी अनुभूती ! !

म्हणुनच म्हटलं कोणास ठाऊक कालच्या पहाटे कुठे होतो आम्ही ..

- अदिती

Thursday, December 3, 2009

बॅंगलोर मधे दांडीया रास ??? ... होय .. बॅंगलोर मधे दांडीया रास ! !

इतकी वर्षं नवरात्री - गरबा - दांडीया हे महाराष्ट्रात जरी भरभरून असलं तरी आम्ही सगळे मित्र-मैत्रीणी उत्साहाने टिप-या घेऊन दांडीया खेळायला गेलोय असं कधीच घडलं नव्हतं. आधीच टिप-या हातात कश्या धरायच्या इथपासून सुरुवात ! मग टिप-या खेळताना (खरं तर मारताना) त्या आपल्या पार्टनर च्या टिप-यांनाच लागताहेत की त्यांच्या बोटांना, मनगटाला लागत आहेत ही भिती (आणि मनातून गंमत), आणि त्यात भर म्हणजे लागलेल्या गरबा गाण्यांच्या तालाचा perfect अंदाज घेत योग्य वेळी योग्य टिपरी योग्य टिपरीलाच लागली पाहीजे..! छे !! भलतंच अवघड !! आणि perfect किंवा परिपूर्ण गरब्यासाठी चेह-यावर स्मितहास्य, नाचताना grace आणायची आणि हे सगळं ठेका न चुकवता ??!! तर एकूणच सगळा आनंदी आनंदच !

आणि अशा परिस्थितीत बॅंगलोर मधे आम्हाला - मी, प्रिया आणि काही मित्र मंडळी - रास दांडीया ला जाण्याचा chance मिळत होता ! म्हटलं चला जाऊन तर बघू. पॅलस ग्राऊंड नावाच्या ग्राऊंड वर भव्य मंडप उभारुन रास दांडीया साठी खास सेट उभा केला होता. रात्री ९ पर्यंत पोचल्यास मुलींना free entry होती. आता फ़ुकट कार्यक्रम, फ़ुकट पार्टी, फ़ुकट जेवण (quality जेवण हं!)यावर झडप घालणारे आम्ही साहजिकच free entry साठी कधी नव्हे तो वेळेत पोचायचा आटोकाट प्रयत्न करणार यात तिळमात्र शंका नव्हती. पण पॅलस ग्राऊंड चं मुख्य गेट माहीत आहे असं म्हणवणा-या आमच्या एका हुशार(?) मित्राच्या मागे गोल गोल फ़िरत ९ कधीच वाजून गेले. हो, गोल गोल अश्यासाठी की आम्ही पॅलस ग्राऊंड च्याच भोवती फ़िरत बसलो होतो मुख्य entrance gate शोधत !! :)

आणि एकदाचं ते गेट सापडल्यावर आम्ही आत जाण्याच्या लगबगीत असताना तिथल्या Guard ने आम्हाला अडवलं. ’मॅडम तिकिट ? ’. Free entry ची स्वप्नं बघत आणि मुख्य गेट सापडल्याच्या नादात ९ वाजून गेले आहेत याचं भान राहीलं असतं तर काय !.. झालं .. सगळयांनी रांगेत उभे राहून शिस्तीत्त १५० रु. चं तिकिट काढलं. तिकिट परवडेबल होतं. बॅंगलोर मधे आल्यावर १५० रु. १५रु. असल्यासारखे वाटतात ! असो. तर आत गेल्यानंतर पाहिलं की डावीकडे खाण्यापिण्याचे स्टॉल होते.. आणि उजवीकडे मुख्य रिंगण गरबा खेळण्यासाठी. आत चक्कर टाकली आणि पाहिलं की स्टेज वर छान वाद्यं मांडून ठेवली आहेत.. ड्रम्स, ढोल, तबला, बासरी, key board ..वाटलं.. असतील एखाद्या ऑरकेस्ट्राची. थोड्या वेळाने सगळे बाहेर आलो. म्हटलं जरा खादाडी करावी.. तोच आमचा "डिनर" होता.. पाव भाजी, कच्छी दाबेली, वडा पाव, बर्फ़ाचा गोळा,ऊसाचा रस अश्या पदार्थांची रेलचेल होती. पाव भाजी सोडली तर सगळे पदार्थ rare cateogry मधले होते, rare म्हणजे बॅंगलोर मधे मिळण्याच्या दृष्टीने ! म्हटलं दाबेली, वडा पाव चे प्रयोग नको. पाव भाजी घेऊन पाहावी.. बॅंगलोर मधे आत्तापर्यंत खाल्लेली ती सर्वोत्कृष्ट पाव भाजी होती. खास मुंबई स्टाईल ! मनसोक्त हादडल्यावर आणि गरब्याची गाणी ऐकू यायला लागल्यावर म्हटलं चला CD play केली वाटतं गरब्याची म्हणुन आत गेलो गरबा खेळण्यासाठी. आणि मी पाहातच राहिले. ती गाणी live चालू होती !!! गायक, गायिका, वाद्यवृंद असा सगळा live ऑरकेस्ट्रा होता. (मला हे नंतर कळलं की सगळीकडे दांडीया निमित्त असंच असतं.. recorded CD वगैरे नसते. पण माझ्यासाठी ते नवीन आणि थक्क करणारं होतं.) आणि सगळे इतके तालात सुरात होते की खरंच बाहेरून नुसतं ऐकून recorded गाणीच वाटत होती. रिंगणात सगळं गुज्जू पब्लिक नटुन थटुन आलं होतं आणि सगळे गरबा खेळत होते.. सुरूवातीला आम्ही त्या रिंगणात जायला धजत नव्हतॊ. कारणासाठी पुन्हा पहिला परिच्छेद वाचणे. :) पण मग १५०रु. ची पावती हातात बघताच मुकाट्याने आम्ही एकदाचे रिंगणात सज्ज झालो आणि बाकीच्यांची कॉपी करत ताल धरण्याचा प्रयत्न करत गरबा खेळायला सुरूवात केली. गरबा टाळ्या वाजवून खेळतात आणि दांडीया टिप-यांनी हे मला त्या दिवशी कळलं.

तर खुप वेळ गरबा खेळल्यावर (?) पुन्हा पोटात कावळे ओरडायला लागले. चला ! परत पोटपुजेला आम्ही आपले बाहेर स्टॉल्स कडे कुच केले. यावेळी म्हटलं जरा वडा पाव, दाबेली try तर करून बघू. म्हणुन मी आणि प्रियाने दोघात एक वडा पाव घेतला. १०रु. ला एक. स्वस्तच वाटला. :) वडा पाव serve करताना त्यांनी पावाला गोड चटणी लावली, आणि वडा पाव बरोबर मस्त झणझणीत लसणाची चटणी आणि मीठ लावलेल्या हिरव्या मिरच्या ! बघूनच ’दिल खुष हो गया’ आणि चवीला पण इतका कमालीचा झकास होता वडा पाव की आम्ही लगेचच अजून २ वडा पाव आणि २ दाबेलीची order दिली. आता खरंच अती वाटेल पण दाबेली सुद्धा उत्कृष्ट होती, खास गुजराथी पद्धतीची! खमंग आणि चविष्ट ! झकास हाच योग्य शब्द आहे खरं तर. आम्ही अहमदाबाद च्या किंवा बडोद्याच्या कुठल्या तरी खाऊ गल्लीत आलो आहोत असं एव्हाना वाटायला लागलं होतं आम्हाला !
कारण स्टॉलवाले पण गुज्जु! त्यामुळे ते एकमेकांशी गुजराथीत बोलत होते.
आता जरा desert होऊन जाऊ दे, म्हणुन बर्फ़ाचे गोळे खाल्ले. काला खट्टा,मिक्स,रोझ असे flavours try केले..... अनपेक्षित अशी मनसोक्त आणि मनासारखी खादंती झाल्यानंतर आठवलं अरे आपण दांडीया खेळायला आलो आहोत. :) परत आत गेलो आणि दांडीयाची गाणी सुरू झालेली असल्यामुळे टिप-या हातात घेऊन रिंगणात आलो.(युद्धासाठी सज्ज झाल्यासारखंच वाटत होतं) आम्ही परत कॉपी करत करत तालाचा अंदाज घेत योग्य वेळी योग्य टिपरी योग्य टिपरीला लावत मनसोक्त दांडीया खेळलो. संथ लयीपासून द्रुत लयीकडे कलणारी गाणी अतिशय सुंदर गायली जात होती हे वेगळं सांगायला नकोच !
रात्रीचा १ वाजल्यावर आम्ही सगळ्यांना चला चला म्हणत अक्षरशः रिंगणातून बाहेर खेचत आणलं. आणि घरी निघालो.

असा हा रास दांडीया चा सुरेल, उत्साहमय अनुभव आणि खाऊ गल्ल्या किंवा चटपटीत street food चा आधीच उल्हास असलेल्या बॅंगलोर मधे दांडीया रास(निमित्तमात्र)मुळे आम्हाला मिळालेल्या अश्या अनपेक्षित चविष्ट Treat मुळे ती संध्याकाळ आमच्या आठवणींच्या कोंदणात कायमची कोरली गेली !

-अदिती

Friday, October 16, 2009

उकडीचे मोदक - माझा पहिला वहिला प्रयोग


पुरणपोळी च्या यशस्वी प्रयोगानंतर असाच एखादा खास अस्सल मराठी पदार्थ करावा असं डोक्यात होतं. आणि अनायासे गणेशोत्सव चालू होताच. बॅंगलोर मधे गणेशोत्सव चालु आहे हे विशेष जाणवत नाही. आपलंच तारखेकडे लक्ष असेल तर .. २-३ दिवसांनंतर अनंतचतुर्दशी होती. चला! ठरलं. विसर्जनाच्या दिवशी मोदक तेही उकडीचे करायचे. पण पहिल्यांदाच करणार म्हणुन आधी सॅंपल म्हणुन करुन पहावे असं ठरवलं. पण रोजच्या ऑफ़ीसच्या रुटीन मधे सॅंपल बिंपल करणं बाजुला राहीलं आणि विसर्जनाचा दिवस येऊन ठेपला. माझा उकडीचे मोदक करण्याचा मानस खुपच पक्का होता, त्यामुळे प्रयोग तर प्रयोग अशी बिनधास्त (बिनधास्त कसलं..मनात एक मेजर टेन्शन होतंच, बिनधास्त म्हणायचं ते आपलं स्वत:लाच moral support द्यायला) भुमिका ठेवून मी गुळाचा डबा काढला. नारळ खवूनच ठेवलेला होता. पटाकन सारण करुन घेतलं. म्हणजे कमी टेन्शन असलेली कृती आधीच केली.

आता राहिलेला होता खरा challenging भाग. तांदुळाची पिठी घेतली आणि आईने सांगितल्या प्रमाणे उकड करायला सुरूवात केली.उकड शिजली.गॅस बंद केला पण तरी उकड खूप घट्ट वाटत होती. अजुन मऊसर हवी असं वाटत होतं. आईच्या सल्ल्याने पाणी टाकुन फ़ेरफ़ार बदल केले आणि पटापट मोदक करायला घेतले. पहिला मोदक अगदी सुरेख सुबक नसला तरी मोदक वाटावा इतपत आकार त्याचा नक्कीच आला होता. आपण खुष झालो एकदम आणि मग पटापट पुढचे मोदक करायला घेतले.

जसजसे पुढचे मोदक करायला लागले, तसतसे उकड गार होत असल्यामुळे मोदक वळवायला त्रास व्हायला लागला. एकीकडे ऑफ़ीसची वेळ होत होती. आपली धावपळ होत आहे हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं.
घरी कॅब घ्यायला येते पण मोदक प्रकरणामुळे cab काही आत नशीबात नसणारे असं वाटून मी एका cabmate ला कळवलं की आज मी कॅब ने नाही येणार. केलेल्या उकडीचे एकुण ९ मोदक केल्यानंतर शेवटी थांबले; सारण तसंच ठेवलं. मग मोदक उकडायला लावले. आणि ऑफ़ीस च्या तयारीला लागले. मोदक घेऊन निघाले तेव्हा लक्षात आलं.. नेहमी निघते त्या पेक्षा २० मि. उशीर झाला होता. बाहेर पडले रिक्षा शोधायला.. आणि काय वाटलं कोण जाणे मी cabmate ला फोन केला विचारायला की कॅब निघून गेली आहे का .. कधीतरी चुकून traffic मुळे cab ला उशीर होतो म्हणुन म्हटलं चान्स घ्यावा आणि काय news मिळावी मला !! cab अजुन माझ्या घरावरून पास झालीच नव्हती. मी लगेचच त्याला सांगितलं की मला घ्यायला या मग. अशा प्रकारे मोदक पण झाले आणि cab पण चुकली नाही. मी देवाची भक्त बिक्त असते तर मी म्हणाले असते की ’भगवान ने मेरी सुन ली’(tone जरा filmy style मधे) गणरायानेच कॅब उशीरा पाठवली कारण त्याच्या साठीच नैवेद्य करत होते ना.. :)

ऑफ़ीस मधे पोचल्यावर लगेचच माझ्या मराठी मित्र मंडळींना मी Pantry त बोलावलं. मोदक पाहुन सगळ्यांची कळी खुलली हे वेगळं सांगायलाच नको. तुपाची बाटली पण नेली होती मुददाम. गणपतीच्या काळात उकडीचे मोदक निदान एक एकच का होईना पण खायला मिळाला त्यामुळे जनता खुष झाली. आणि मी तर जाम खुष होतेच !

-अदिती

Friday, October 2, 2009

निलेश मोहरीर साहेब, मानलं बुवा आपल्याला !

गर्द केशरांची फ़ुले आणि सनईचे सूर
सारे असती भोवताली तरी मनात काहूर ॥

स्वप्नात माझिया फ़ुलती दोन केशरांचे दिवे
नव्या वयाचे गुज, रोमरोमी गंध नवे ॥

दिल्या सोडून पाण्यात मी बालपणीच्या होड्या
उंच उंच तो पतंग भोळ्या भाबड्या त्या खोड्या ॥

नव्या दिशा जरतारी एक अनोळखी वाट
त्याच्या माझ्या मनामधे अबोलसा अंतरपाट ॥


सध्या मराठी दूरदर्शन जगतात चालु असलेल्या मालिकांच्या पुरामधे ’अंतरपाट’ ही अजुन एक नुकतीच सुरू झालेली मालिका. आणि इतर मालिकांप्रमाणेच हिला सुद्धा एक अद्वीत,अतुल्य शीर्षक गीत किंवा title song लाभलं आहे; किंबहुना हे म्हणीन की मालिकेचा विषय फ़ारसा नवीन नसला तरी शीर्षक गीत खुपच छान रचलं गेलंय. त्या गाण्यामधे एक वेगळेपणा आहे; freshness(हो, हाच शब्द योग्य आहे.. ताजेपणा वगैरे लिहिण्यापेक्षा)आहे. आता गाण्याचा मुळ बाज अर्थात लग्न, लग्नाळु मुलगी, लग्नाचं वातावरण याच्याशी मिळता जुळता आहे आणि असायलाच हवा, पण तरी निलेश मोहरीर ने ते इतक्या अप्रतीम प्रकारे रचलं आहे की तोडच नाही.
गाण्यातील काही जागा खरंच भाव खाऊन गेल्या आहेत. खास करुन ’माझिया’ मधलं ’या’ म्हणताना ’दिवे’ वरून ’नव्या’ वर येताना किंवा रोमरोमी मधला रोमी म्हणताना, ऐकताना मिळणारा आनंद शब्दातीत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या नंतर background वर येणारा गायकाचा आलाप तर गीताचं सौंदर्य द्विगुणीतच करतो. पुन्हा बेलाच्या आवाजातलं ’दिल्या सोडून पाण्यात’ ह्या शब्दांचे सूर तर कोणत्याही मुलीच्या किंवा व्यक्तीच्या ...असं म्हणणं जास्त योग्य ठरेल... ह्रदयाला हात घालतात. आणि ’उंच उंच तो पतंग भोळ्या भाबड्या त्या खोड्या ... नव्या दिशा जरतारी एक अनोळखी वाट ’ हा patch तर हे गाणं अद्वीत होईल याची काळजी घेतो. आणि ’अंतरपाट’ हा शब्द शेवटी गायला जातो त्या क्षणी सुरावटींच्या सुखद सुंदर प्रवासानुभवातून जाऊन आपण मंत्रमुग्ध झालेलॊ असतो. फ़क्त एवढंच की गाणं डोक्यात register होण्यासाठी २-३ दा तरी ते लक्षपुर्वक ऎकायला हवं.
प्रत्येक मुलीमधे दडलेली निरागसता, मिश्किलपणा, फ़क्त स्वत:शी साधलेला संवाद, मनाशी असलेला प्रामाणिकपणा या सगळ्याची पुरेपूर आठवण हे गाणं ऎकताना होते.. निदान मला तरी झाली.

निलेश मोहरीर ने या आधी ’कळत नकळत’ आणि ’कुलवधु’ या मालिकांची शीर्षक गीतं रचली आहेत.’कळत नकळत’ हे वैशाली सामंतने म्हटलं आहे आणि ’कुलवधु’ वैशाली माडेने गायले आहे. आणि आता हे ’अंतरपाट’ गायलंय बेला शेंडेने. ही तिन्ही गाणी इतकी वेगळी,तोडीस तोड आणि गोड सुरावटींची आहेत... आणि या तिन्ही गायिकांनी देखील ह्या गाण्यांना योग्य न्याय दिला आहे. निलेशने सुद्धा प्रत्येक गाणं वेगळ्या गायिकेला देऊन आपलं वेगळेपण जपलं आहे. म्हणुनच म्हटलं मोहरीर साहेब, मानलं बुवा आपल्याला !

-निलेश ची नवीन फ़ॅन
अदिती

Followers