१५ सप्टेंबर १९५५. देशपांड्यांच्या घरात एक अत्यंत शांत स्वभावाच्या मुलीचा जन्म झाला. पावसाळ्यातला जन्म म्हणून नाव ठेवले वर्षां. मुळात च अतिशय प्रतिभावान, हुशार घरामध्ये जन्म. तिच्या जन्मा नंतर वडिलांची प्रगती, भरभराट झाल्यामुळे वडिलांचं तिच्यावर विशेष प्रेम. वडील अत्यंत हुशार आणि हौशी. वेगवेगळ्या गोष्टी, स्वैपाकाची आवड, पण स्वभाव रागीट आणि गंभीर अशी ख्याती. आई म्हणजे माझी आजी खूप म्हणजे खूप च प्रतिभाशाली, गुणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व. कीर्तनकार, चित्रकार, नक्षीकाम कलाकार, नेतृत्वकला आणि अर्थात च पाककला यात नैपुण्य, एकदम जोरदार पण तापट स्वभाव. बहीण, भाऊ पण अत्यंत बुद्धिमान पण पुन्हा तेच अंगी थोडा अग्रेसिव स्वभाव. आईचा मात्र पूर्णपणे परस्परविरोधी स्वभाव. हीच मला खूप कुतूहलाची गोष्ट वाटली आहे कायम. की एवढ्या स्ट्रॉंग लाउड कुटुंबात अत्यंत बुद्धिमान आणि अगदी शांत, समजूतदार, सुरुवातीला अबोल वाटावे असे व्यक्तिमत्व.. म्हणजे बरोब्बर नकारात्मक गोष्टी वर्ज्य करून चांगले गुण, बुद्धी, प्रतिभा आई वडिलांकडून वेचून वेचून घेतल्यासारखे.. हीच मला कायम भारी गोष्ट वाटत राहिली..
कशी गंमत असते ना..मला कायम आई एक व्यक्तिमत्व म्हणून अश्या काही गोष्टी खूप कुतुहलाच्या आणि यूनीक वाटल्या आहेत.. म्हणजे आई म्हणून नाही एकंदरीत एक व्यक्ती म्हणून मी सांगते.. आता उदाहरण म्हणून एक नेहमीची सकाळ जर का आपण घेतली, तर सकाळचा पहिला चहा, मॉर्निंग वॉक, नंतर ब्रेकफास्ट/स्वैपाक, मग इतर कामे, स्वतःचे आवरणे वगैरे.. हे सगळेच आपण करतो.. पण काही बारीक बारीक गोष्टी म्हणजे चहा / कॉफ़ी ब्रेकफास्ट कधीच घाईत, उभे राहून न घेणे, मग काम असो, ऑर्डर असो, अजून काहीही असो. कायम शांतपणे बसून आपला पहिला चहा, मग ब्रेकफास्ट. न चुकता गोळ्या औषधे, म्हणजे एक वेळ गजर रिमाइंडर बंद पडेल पण आई औषधे नाही विसरणार..ठरवलं की ठरवलं. गडबड नाही, गोंधळ नाही. सेल्फ केअर आणि फिटनेस बाबतीत तर तिने इतका अप्रतिम आदर्श ठेवला आहे. म्हणजे ज्यावेळी सेल्फ केअर हा शब्द सुध्दा असा सहज वापरात नव्हता तेव्हा पासून तिने तो आपल्या कृतीतून दर्शवला आहे.
आता प्रतिभा, टैलेंट. म्हणजे मी इतक्या वैविध्यपूर्ण गोष्टी आईला करताना पाहिले आहे की हॅट्स ऑफ. पटकन यादी करावी म्हटलं तर, एम्ब्रॉइडरी, शिवणकाम, कापडी बॅग्स, मोत्यांचे दागिने, टोमॅटो/चिंचेचे सॉस, फ्रूट जैम, मग डायल फॉर पार्टी फ़ूड आणि मग नंतर पेपर क्विलिंग, मंडला. काम किंवा कला काहीही असो, त्यात झोकून देऊन आपले १०१ टक्के देणं हा आईचा एकदम सिग्नेचर स्वभाव.
एम्ब्रॉइडरी म्हणजे मोठमोठ्या चादरींपासून माझ्यासाठी, मैत्रिणींसाठी साड्या, ड्रेस पिसेस भरून देईपर्यंत, कापडी बॅग्स बिझिनेस - लहान असताना आम्ही तिला एक तर स्वैपाक घरात पाहिलय नाहीतर शिवण मशीन वर. म्हणजे massive इज़ द वर्ड .. एवढं अफाट काम करताना पाहिले आहे... औरंगाबाद च्या अनेक कस्टमर्स नी तिने शिवलेल्या बॅग्स भरपूर काळ वापरल्या असतील. या दोन्ही कलांमध्ये आवर्जून उल्लेख करण्याची गोष्ट म्हणजे परफेक्शन. एकदम नीट, सुबक, सुंदर, polished, accurate, बघत राहावे असे काम.
त्या नंतर फ़ूड इंडस्ट्रीत वळल्यावर तर यात आपलं पूर्ण विश्व निर्माण करणारी आई. सुरळीच्या वड्या, उकडीचे मोदक, कोथिंबीर वडी, पुरणपोळी असे एक से एक स्पेशालिटी पदार्थ आधी घरून private ऑर्डर्स, मग शाळेशी काँट्राक्ट मग Varsha's Kitchen नावाने फ्रेश फ़ूड स्टॉअर मधून व्यवसाय वाढवून आणि मग पुढे पुण्याला येऊन सुद्धा काम तिने कायम सुरूच ठेवलं. बरं हे चालू असताना घरी जेवणात नो कोम्प्रोमाईज़. आम्हाला रोज नवनवीन मेन्यू असायचेच. मग पुण्यात पार्टी ऑर्डर्स, नंतर ज्येष्ठ नागरिकांना डबे, तेही इतके सुंदर की आईला अजूनही कोशिंबीर क्वीन म्हणतात आणि आठवण काढतात. मधे मधे कनेक्ट with लोकल सारखे प्रयोगही झाले. या सगळ्या व्यवसायांमधून आईची नेतृत्व कला, कोणतेही काम पूर्णत्वाला नेण्याचा स्वभाव आणि व्यवसाय व विक्री कौशल्य खूप ठळकपणे बघायला मिळते.
हे सगळं आता मला मागे वळून बघताना एक असं जाणवलं की आई ने कला ही नुसती छंद म्हणून किंवा असंच टाईमपास पुरती नाही जोपासली तर तिने आपले संघर्ष, लढे, कोणत्याही व्यक्तिगत समस्या या सगळ्यावर कलेच्या माध्यमातून च मात केली. आणि मी जेव्हा आई शी ह्यावर चर्चा केली, तेव्हा तिला ही ते जाणवलं, पटलं, म्हणजे कला ही तिची थेरपी आहे. हे किती भारी आहे ना म्हणजे आपल्या कृतीमार्फत नकळत आपणच आपल्याला ताणातून बाहेर काढणे हा किती महत्त्वाचा धडा आम्ही शिकलो, तेही सल्लेबाजी न करता. फक्त कृतीतून.
दूरदृष्टी हा पण एक खूप महत्त्वाचा गुण आहे आईकडे. म्हणजे एक बोलके उदाहरण म्हणजे अथश्री सारख्या सोसाइटी मधे आपल्याला राहायचे आहे आणि कशी ही सोसाइटी नंतर अत्यंत उपयोगी पडणार आहे हे तिला २५ वर्षांपूर्वीच माहीत होते. आणि पाहा आज तिथे अथश्रीत राहायला जाऊन आपली पाककला वापरून लोकांना मदत आणि आपला वेळ सत्कारणी लावलं हे तिने सुरू च ठेवले आहे.
आता ह्या सगळ्या परफेक्शनिस्ट, सर्वगुणसंपन्न अश्या व्यक्तित्वामध्ये काही गोष्टी असतात च नाही का.. म्हणजे जरा अतीच परफेक्शन किंवा नेमके पणा, वेळेचा काटेकोरपणा म्हणजे हा चांगला च गुण आहे पण तरी.. प्लानिंग.. सगळं ठरवून, नीटनेटकेपणा ने करणे, अगदी आर्मी, रिसर्च अश्या फील्ड मधे शोभावे असे, मला पूर्वी वाटायचे, आई तू साइंटिस्ट डॉक्टर अश्या फील्ड मधे जायला हवी होतीस असे म्हणायचे मी, पण आता वाटतं जे आयुष्य मिळालं त्याचं चीज करायला जमलं ना तिला, त्यात च खरा दम आहे. जर तर ला काही अर्थ नाही.
आणि मग या सगळ्यांनंतर आजूबाजूला असणाऱ्या सीनियर मंडळींसाठी काहीतरी करायचे आहे ह्या तळमळीतून एक लाट, एक वादळ, एका evolution चा, उत्क्रांतीचा जन्म झाला. तो म्हणजे Brain treat मेमरी क्लब. ब्रेन आणि मेमरी सारख्या कळीच्या मुद्द्यावर काय कमाल काम घडलं आहे आईकडून, बोलावं तितकं कमी. आणि तिला भक्कम साथ मिळाली तुम्हा सगळ्यांसारख्या डेडिकेटेड मैत्रिणींची. इतकं अप्रतिम टीम वर्क झालेलं आहे. यावर तर एक वेगळं लेक्चर होईल इतका कंटेंट आहे;
तर म्हणून थोडक्यात सांगायचे तर आई, असं खंबीर, rational आणि परीसस्पर्श असलेलं व्यक्तिमत्व असलेल्या तुझं एवढं कौतुक आणि इतका अभिमान आहे आम्हाला म्हणजे अद्वय च्या भाषेत infinite अभिमान. तर आजच्या ह्या दिवसाचे औचित्य साधून मला हे व्यक्त करायची संधी मिळाली. याबद्दल मी धन्यता मानते. आई, तुला आम्हा सगळ्यांकडून ७० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार.